Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्व. सरिता खानचंदानी यांच्या स्मरणार्थ नदीसंरक्षणाची नवी चळवळ

             ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रतिनिधी 

 प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण यंदा या दिवसाने वेगळेच रूप धारण केले. गुलाबांच्या फुलांऐवजी पर्यावरण प्रेमींच्या हातात होता नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प, आणि भावना व्यक्त करण्याचे माध्यम होते उल्हास व वालधुनीसारख्या मृतप्राय होत चाललेल्या नद्यांप्रती असलेले जिव्हाळ्याचे प्रेम.... स्वर्गीय श्रीमती सरिता खानचंदानी यांच्या स्मरणार्थ आगामी नदी संवर्धन मोहिमेला “उल्हास वालधुनी सरिता संवर्धन अभियान” असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

कल्याण तालुक्यातील दहागाव-वाहोली येथील नील्स फार्म येथे उल्हास व वालधुनी नदी संवर्धन समितीच्या बैठकीत विविध पर्यावरणवादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढते प्रदूषण, अनियंत्रित सांडपाणी, अतिक्रमणामुळे संकुचित झालेले नदी पात्र आणि गटारीचे स्वरूप धारण केलेल्या प्रवाहाला पुन्हा कसे सजीव करता येईल, यावर सखोल विचारमंथन झाले. नदीपात्र रुंदीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची गरज, जनजागृती मोहिमा, कायदेशीर लढाई आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय या विषयांवर ठोस मते मांडण्यात आली.

वालधुनी बिरादरी (बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर), उल्हास नदी बचाओ समिती (बदलापूर, कल्याण), वॉटर फाउंडेशन, निल पर्ल फाउंडेशन, द युवा युनिटी, तसेच पत्रकार, वकील आणि पोलिस मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येकाने पर्यावरणासाठी काम करताना आलेले अनुभव आणि आव्हाने मांडत सामूहिक लढ्याची गरज अधोरेखित केली.

स्वर्गीय सरिता खानचंदानी यांनी वालधुनी नदीसाठी केलेले कार्य, त्यांची जिद्द आणि समाजजागृतीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त झाला. “नद्या वाचल्या तरच आपले भविष्य सुरक्षित राहील,” हा संदेश देत या अभियानातून व्यापक लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प करण्यात आला. उल्हास आणि वालधुनीला पुन्हा स्वच्छ, प्रवाही आणि सजीव करण्यासाठी ही मोहीम आता नव्या उर्जेने पुढे सरकणार आहे. 

प्रतिक्रिया :-शशिकांत दायमा ( पर्यावरणप्रेमी )

“उल्हास आणि वालधुनी या नद्या आपल्या शहराच्या जीवनवाहिनी आहेत. गेल्या काही वर्षांत वाढते प्रदूषण, सांडपाणी आणि अतिक्रमणामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता केवळ चर्चा नको, तर कृतीची वेळ आली आहे. ‘उल्हास वालधुनी सरिता संवर्धन अभियान’ हे फक्त नाव नाही, तर पर्यावरण रक्षणाचा ठाम निर्धार आहे. स्वर्गीय सरिता खानचंदानी यांनी नदी संवर्धनासाठी दिलेला लढा आम्हाला प्रेरणा देतो. त्यांच्या स्मृतीतून ही चळवळ अधिक व्यापक करू. नद्या वाचवणे म्हणजे आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे होय. प्रशासन, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप द्यावे, हीच अपेक्षा आहे.”

Post a Comment

0 Comments