Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा

                  ब्लॅक अँड व्हाईट जुन्नर वार्ताहर 

 किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग असल्याचे सांगितले. २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.


या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख आणि मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समता, न्याय आणि स्त्रीसुरक्षेवर आधारित स्वराज्य उभारले. त्यांनी करप्रणाली सुलभ करून सुमारे ५० प्रकारचे कर रद्द केले, जलदुर्ग उभारून समुद्रमार्ग सुरक्षित केला आणि शेतकरी व सामान्य जनतेच्या हिताचे राज्य निर्माण केले. तसेच शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाल्याचे त्यांनी सांगितले.



उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता मोहीम अधिक वेगाने राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांनी शिवनेरी किल्ला हे प्रेरणास्थळ असून त्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांचा पाळणा गायिला, तर पोलीस बँडने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला.

यावेळी प्रगतशील शेतकरी स्व. पंकज वामन, डॉ. विनोद सीताराम हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, शिवाजीराव खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments