ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर
एनसीपीए मुंबई डान्स सिझन अंतर्गत, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांच्या प्रायोजकत्वाखाली, गायत्री भट यांच्या पदन्यास कथक इन्स्टिट्यूटने आदर्श विद्यालय, बदलापूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेला जननी महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला. एनसीपीए मुंबई डान्स सिझनमधील हा तिसरा जननी सिझन होता.
जननी – नातं एक, रंग अनेक या आगळ्या-वेगळ्या संकल्पनेत आई-मुलगी, तसेच गुरु-शिष्य या नात्यातील कलाकारांनी पारंपरिक शास्त्रीय नृत्यशैली सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदुषी सौ. काश्मिरा त्रिवेदी (आदरणीय भरतनाट्यम गुरु व शास्त्रीय नृत्य महोत्सवांच्या आयोजक) यांनी भूषवले. एनसीपीएकडून श्री. आदित्य उपस्थित होते.
ओडिसी नृत्यांगना नम्रता मेहता व अनाहित्ता मेहता या जोडीने सादर केलेले सुस्वरूप नृत्य, कथक नृत्यांगना डॉ. टीना तांबे व गायत्री तांबे यांचे जोशपूर्ण सादरीकरण, तसेच गुरु काश्मिरा त्रिवेदी यांच्या ज्येष्ठ शिष्या स्वाती व माधुरा यांच्या मोहक अभिनयाने बदलापूरच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यजमान गुरु गायत्री भट व सुहानी भट यांनी द्रुपदातून (गीत: गायत्री भट) श्रीगणेश स्तुती सादर करून महोत्सवाची सुरुवात केली. सुहानीने ऊर्जेने परिपूर्ण ताल बसंत सादर केला, तर गुरु गायत्री भट यांनी ‘बंसी कथा’ या अभिनयप्रधान रचनेत समर्पणभावाने प्रेक्षकांना भावविभोर केले.
ओडिसी सादरीकरणाची सुरुवात नम्रता व अनाहित्ता मेहता यांच्या युगल पल्लवीने झाली. अनाहित्ताने सादर केलेली नाजूक अष्टपदी आणि गुरु नम्रता जी यांनी सादर केलेला द्युत क्रीडेतील द्रौपदीचा संवेदनशील भाव प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेला.
डॉ. टीना तांबे व गायत्री तांबे यांनी शिव स्तुतीने सुरुवात करून पुढे ताकदीचा पखावज ताल, धमार सादर केला. त्यांच्या हालचालींनी रंगमंच जणू एक सुंदर कॅनव्हास बनवला. “या मोहन के में रूप लुभानी” या अभिव्यक्तीतून त्यांनी राधेच्या शृंगार भक्तीपासून मीराच्या माधुर्य भक्तीपर्यंतचा प्रवास प्रभावीपणे उलगडला.
गुरु काश्मिरा त्रिवेदी यांच्या ज्येष्ठ शिष्या स्वाती व माधुरा यांनी शिव-शक्तीच्या आत्मविश्वासपूर्ण व सुस्वरूप सादरीकरणाने रंगमंच जिंकून घेतला. विदुषी सौ. काश्मिरा जी यांचे ‘कृष्णानी बेगाने बारो’ मधील भावविशेष अत्यंत हृदयस्पर्शी ठरले.
यावर्षी "निर्मल जननी पुरस्कार" सुरू करण्यात आला असून, त्याचा पहिला मान विदुषी काश्मिरा त्रिवेदी यांना प्रदान करण्यात आला. शास्त्रीय नृत्याला मातेसारख्या ममत्वाने जोपासण्याची त्यांची निष्ठा व समर्पण यासाठी हा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ या गीताच्या १५० वर्षांच्या पूर्तीनिमित्त भारतमातेप्रती आदरांजली अर्पण करून करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रसंचालन जबाबदारी दुहिता सोमण -खेर यांनी त्यांच्या ओघवत्या वाणीने अत्यंत सुंदररीत्या पार पाडली. नगराध्यक्षा सौ. रुचिता घोरपडे तसेच श्री. व सौ. संभाजी शिंदे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
उत्साही प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रमाने नवी उंची गाठली. एकाच मंचावर विविध शास्त्रीय नृत्यशैली पाहण्याचे भाग्य बदलापूरकरांना लाभले. यासाठी आयोजक पदन्यास कथक इन्स्टिट्यूटच्या संचालिका गुरु गायत्री भट — यांचे विशेष कौतुक एनसीपीए प्रतिनिधी श्री. आदित्य यांनी केले.
.jpg)





Post a Comment
0 Comments