२७ फेब्रुवारी! मराठी भाषा गौरव दिन!
अर्थात, कवींचे कवी, थोर नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस!
मराठी भाषेतील अग्रेसर कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून सर्व महाराष्ट्राला सुपरिचित व्यक्तिमत्व असणारे आपल्या सर्वांचे तात्यासाहेब! इसवी सन १९८७ च्या तेविसाव्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी, इसवी सन १९८९ मध्ये मुंबई येथे भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष आणि पुणे विद्यापीठाने डी.लिट. या सन्मानदर्शक पदवीने सन्मानित केलेले वि. वा. शिरवाडकर! शिरवाडकरांनी त्यांच्या साहित्य लेखनातून मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. मराठी सारस्वताची त्यांनी अखंडपणे सेवा केली. साहित्य क्षेत्राला नवा आयाम व नवे वैभव प्राप्त करून दिले. त्यामुळेच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व उत्साहाने साजरा केला जातो.
मराठी ही आपली मायबोली आहे, ही बाब आपल्यासाठी भाग्याची आहे.
“लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी।
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय, मानतो मराठी!”
मराठी भाषेची परंपरा अत्यंत उज्ज्वल व समृद्ध आहे. मराठीचे साहित्य, इतिहास, संतपरंपरा, लोकसंस्कृती, आणि सामाजिक असे योगदान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठी भाषा सुमारे १००० वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. १२व्या शतकातील यादवांच्या काळात तिचा वापर लिपीमध्ये झाला. अनेक शिलालेख, ताम्रपट व हस्तलिखिते यावरून तिचा इतिहास दिसून येतो. मराठी भाषेच्या समृद्धीला संतांच्या साहित्याने मोठे योगदान दिले. संत ज्ञानेश्वर (१२७५-१२९६) यांनी 'भावार्थदीपिका' म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली, जी मराठीत पहिली महाकाव्यात्मक टीका होती. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांनी आणि ओवी साहित्यातून समाजाला आत्मबळ दिले. संत, पंत व तंत या साहित्य प्रवृत्तींनी अनेक साहित्यिक व त्यांच्या साहित्यिक रचनांनी मराठी भाषेचे दालन समृद्ध केले.
मराठी भाषेने स्वराज्य स्थापनेच्या चळवळीत मोठी भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीतच प्रशासन चालवले. त्यांच्या काळात मराठीत राज्यव्यवहार कोष, राज्यकारभार पत्रव्यवहार, आणि हुकुमनामे प्रसिद्ध झाले. पुढे १८व्या आणि १९व्या शतकात मराठीत अनेक उत्तम लेखक आणि विचारवंत साहित्यिक उदयास आले. लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर, टिळक गोखले, रानडे आदी समाजसुधारकांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले. वि.स.खांडेकर, पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर, प्र.के.अत्रे, विंदा करंदीकर शांता शेळके, शिवाजी सावंत आदींचे अमूल्य योगदान आहे. 
मराठीत लोककलेला मोठा वारसा आहे. लावणी, भारूड, गोंधळ, तमाशा या कला मराठीतूनच विकसित झाल्या. पारंपरिक गीते, कोळीगीतं, गोंधळगीतं, पोवाडे हे लोकसाहित्याच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. मराठी भाषेतील वर्तमानपत्रांची भूमिकाही महत्वाची मानली जाते. १८४० मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. लोकमान्य टिळकांचे ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या पत्रांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच चित्रपट व नाटकांची भूमिकाही महत्वाची मानली जाते. दादासाहेब फाळकेंनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतातील पहिला चित्रपट तयार केला, जो मराठीत होता. मराठी नाट्यसृष्टीत केशवसुत, राम गणेश गडकरी, विजय तेंडुलकर, पु.ल.देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातही मराठी भाषिकांनी मोठे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयंत नारळीकर, मोहन आगाशे, आनंद यादव अशा विचारवंतांनी ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य केले आहे. थोडक्यात, मराठी भाषेची देदीप्यमान परंपरा आहे.
अशा या आपल्या दिव्य मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारकडून अधिकृतपणे 'अभिजात भाषेचा' दर्जा प्रदान करण्यात आला. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे, भाषिक व्यवहाराचे साधन नसून संस्कृती, साहित्य, विचार, कला आणि समाजजागृतीचा आधारस्तंभ आहे. तिच्या या उज्ज्वल परंपरेचा आपण अभिमान बाळगायला हवा. आपण आपल्या मायबोलीच्या अभिजात दर्जाला साजेसा गौरव करण्यासाठी केवळ अभिमान बाळगून न थांबता कृतीशील प्रयत्न करायला हवेत.
कवी यशवंत म्हणतात, ”हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हिला बैसवू वैभवाच्या शिखरी“
आपणही मायबोली मराठी भाषेचे सुपुत्र म्हणून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी, मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी मराठीत सदैव लेखन,वाचन व स्वरचित असे नवनवीन साहित्य निर्माण करणे, त्यात संशोधन करणे आदी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर माउलींनी “माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके; ..ऐसी अक्षरे रसिके मेळविन”
असा विडा उचलला तद्वतच आपणही मराठी भाषेची प्रगती व उन्नती साधण्यासाठी तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीयुक्त यत्न करणे, ही आजच्या काळाची गरज आहे.
अनेक स्तरांवर भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी वेळोवेळी विविध स्पर्धा, उपक्रम, कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखतीचे कार्यक्रम आखले पाहिजेत. ठिकठिकाणी वाचनालये व ग्रंथालये निर्माण केली पाहिजेत. मराठी भाषक व्यक्तींनी वाचन चळवळ व ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत व सहकार्य केले पाहिजे. मराठी वाचन संस्कृती विकास करून ती अधिक बळकट करण्यासाठी कादंबरी, नाटक, कथा, कविता यांच्या वाचन उपक्रमांचे आयोजन करून अभिजात ग्रंथ वाड्मयावर चर्चा, परिसंवाद, लेखन स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. जास्तीत जास्त शाळा–महाविद्यालयांत मराठी वाड्मय मंडळे सुरू करून त्याद्वारे भाषाविकास करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे. विविध विद्यापीठांत मराठी भाषा अभ्यासकेंद्र सुरू करून त्याद्वारे प्राचीन साहित्य, हस्तलिखिते, शिलालेख, बखरी यांचा अभ्यास करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. एकमेकांशी संवाद साधताना मराठीचाच आग्रह धरावा. अन्य भाषिकांशी बोलतानाही शक्यतो मराठीतूनच बोलावे. आपले घर, इमारती,कार्यालय, दुकाने यांच्या नावांच्या पाट्या शक्यतो मराठीतूनच टाकाव्यात. सार्वजनिक ठिकाणांची नावेही मराठीतूनच टाकण्याचा आग्रह धरावा.
अभिजात मराठीच्या गौरवासाठी डिजिटल माध्यमांचा काळजीपूर्वक वापर करून त्याद्वारे ई-ग्रंथ, ई-शब्दकोश, ई-पुस्तके, ऑडिओ-व्हिडीओ साहित्य, पॉडकास्ट इत्यादी मधून अभिजात मराठी साहित्य शुद्ध स्वरूपात उपलब्ध करून दिले पाहिजे. सोशल मीडियावर विशेष करून मराठी भाषेच्या विकासासाठी मराठी संकेतस्थळे, ब्लॉग, यूट्यूब चॅनेल तयार करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. व्हाट्सऍप, फेसबूक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर संवाद साधताना इंग्रजी भाषेऐवजी मराठी भाषेचा वापर करून संवाद साधणे, ही काळाची गरज आहे. नाहीतर आपली मायबोली मराठी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही! जगातील विविध देशांमध्ये आपले आयटी क्षेत्रात जे कार्य करतात किंवा जे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत त्यांनी आणि इतर जाणकार व्यक्तींनी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या मायबोली मराठीतील अनमोल व दुर्मिळ अशा साहित्याची डिजिटल स्वरूपातील उपलब्धता अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी शासनाने व सेवाभावी संस्थांनी तसेच उद्योजक व मराठी प्रेमी दानशूर व्यक्तींनी आर्थिक पाठबळ दिले पाहिजे. कदाचित, या गोष्टी आपण जाणतेपणाने केल्यास मराठीला नवे वैभव प्राप्त होऊ शकेल. आपल्या अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी भाषिक कार्यक्रम व उपक्रम यांचे उत्तम नियोजन करून त्याद्वारे मायबोली मराठीचे संवर्धन आणि संरक्षण केले पाहिजे. मराठी भाषकांनी एक होऊन मनात कोणताही वाद व भेद न बाळगता उत्तम प्रकारे राष्ट्रीय व राज्य अशा अनेक पातळीवर विविध साहित्य संमेलनांचे यशस्वीपणे आयोजन केले पाहिजे. आपण सर्वांनी व शासनाने तसेच अनेक संस्थांनी समर्पण भावनेने व सचोटीने निरंतर प्रामाणिक प्रयत्न करणे काळाची गरज आहे. आपण प्रत्येकाने आपला ‘मराठी बाणा’ मनात जपला पाहिजे. त्यामुळेच आपली मायबोली आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अधिक व्यापक स्वरूप धारण करून विकसित होऊ शकेल. तेव्हाच माऊलींचे “इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी” हे बोल आपण वास्तवात आणू शकू! आणि “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा!”
ही कुसुमाग्रज यांनी दिलेली शिकवणही आपण मनात कोरली पाहिजे. मायबोली मराठी भाषा समृद्ध व विकसित करण्यासाठी तिच्या गौरवशाली व समृद्ध परंपरेची जाण आपल्या मनामनांत सदैव राहिली पाहिजे. मराठी साहित्याचा वारसा जपणे व साहित्याची उज्ज्वल परंपरा जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषेचा एक निष्ठावंत पाईक म्हणून आपल्या अभिजात मराठीच्या गौरवासासाठी आपण हे प्रयत्न जाणीवपूर्वक कराल, हा आशावाद व्यक्त करतो. मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
.jpg)

Post a Comment
0 Comments