Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

निष्ठावंतांचे "रड" कंदन

 

रा ज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची एकच झुंबड उडताना दिसली. मुंबई,ठाणे,कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईसह राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रचंड धावपळ झाली. दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, मनसे या सर्व पक्षांतर्फे बहुसंख्य उमेदवारांना सोमवारी रात्री एबी फॉर्म दिले. त्यातही अनेक ठिकाणी मोठा राजकीय वारसा असलेल्यांना एकाच वेळी दोन..तीन..चार एबी फॉर्म दिल्यामुळेही घराणेशाहीचा हपापलेपणा दिसून आला.त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या नाराज इच्छूकांनी बंडाचा झेंडा फडकावला.

अनेक ठिकाणी आक्रोश करीत संभाव्य उमेदवारांनी विशेषतः महिला उमेदवारांनी आकांडतांडव करीत वरिष्ठांना हैराण केले.नाराज कार्यकर्त्यांची ,बंडखोरांची समजूत घालतांना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे.अजूनही बंडखोरी आणि नाराजी पूर्णपणे शमलेली नाही.

खरेतर ह्या निष्ठावंतांचा आक्रोश पाहून एक प्रश्न पडला की ह्या राज्यात आणि आपल्या परिसरात इतके महान विचारधारा असलेले, समाजसेवेची इतकी तीव्र तळमळ असलेले , हे टाहो फोडणारे उमेदवार पहिले तर असे वाटले की आपल्या समाजाचे आजपर्यंत भले का झाले नाही ?स्वतःला समाजसेवक म्हणवणारे,नगरसेवक होऊन समाजाची सेवा करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आसुसलेले  हे उमेदवार असतील तर मग हा समाज आजही अनेक गोष्टींपासून त्रस्त का राहिला ?

खरंच ह्यांचा आक्रोश हा समाजसेवेसाठी आहे की समाजसेवकाचे पांघरून घेऊन राजकारणात मिळणारा मलिदा खाण्यासाठी ? हा खेळ न समजणारा समाज आता राहिला नाही......ये पब्लिक  हैं ये सब जानती है.. ये पब्लिक है..!

निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव राहिलेला नाही, तो आता संधीसाधूपणाचा बाजार बनला आहे. विचारधारा, निष्ठा, प्रामाणिकपणा या शब्दांना फक्त भाषणांत जागा उरलेली  आहे. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र सत्तेचा आंकड़ा हाच एकमेव देव मानला जात आहे. या आकड्याच्या पुजेत निष्ठावंत कार्यकत्यांचा बळी दिला जातो आहे. कालपर्यंत ज्यांना 'भ्रष्ट'. देशद्रोही, लोकशाहीचे मारेकरी म्हणत होते, त्यांच्याच गळ्यात आज हार घातले जात आहेत. 

" कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा  ?', असा प्रश्न विचारण्याची वेळ दुर्दैवाने ओढवली आहे.  'अर्ज भरणे, उमेदवारी मिळवणे, तिकीटवाटप, जागावाटप, आरक्षण आणि पक्षांतर्गत गटबाजी या घटनांना आलेले विकृत अन् हिंसक स्वरूप पहाता हा उत्सव नव्हे, तर राज्यावर ओढवलेले संकटच आहे कि काय', असे नागरिकांना वाटू लागले  आहे. इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी; मात्र जागा मर्यादित असल्याने मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण होत आहे. याचे पर्यवसान वाद, हिंसा, हाणामारी यांत होतांना दिसते. महाराष्ट्रात कुठेच काही आलबेल राहिलेले नाही.

राजकारणात  त्यागी वृत्ती आणि निःस्वार्थता यांना तिलांजली दिली जात आहे. 'विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण ?', हेही कळेनासे झाले आहे. त्यामुळे आता राजकारणालाच तिलांजली देण्याची वेळ आलेली आहे. सध्याचे  राजकारण इतके उथळ झाले आहे की शत्रु-मित्राचा फरक आता वैचारिक नाही, तर केवळ निवडणुकीपुरता राहिला आहे. युती म्हणजे धोरणांचा संगम न राहता, ती सत्तेची दलाली बनली आहे. या साऱ्या नाट्यात सर्वात मोठी फसवणूक होते ती पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या कार्यकर्त्यांची, गावोगावी, वस्त्या वस्त्यांमध्ये पक्ष उभा करणारे, झेंडे खांद्यावर घेऊन पोलिसांच्या लाठ्या खाणारे,सभा समारंभात सतरंज्या उचलणारे,बॅनर लावणारे कार्यकर्ते आज पक्षासाठी ओझे वाटायला लागले आहेत. त्यांच्या जागी कालच पक्षात आलेले, पैसा, जात, गट किंवा निवडणूक जिंकण्याची हमी देणारे उमेदवार पुढे रेटले जात आहेत. निष्ठेला किंमत नाही, त्यागाला मान नाही फक्त 'जिंकू शकतो का?' एवढाच प्रश्न उरला आहे.

पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्यांना केवळ "थोडा संयम ठेवा, पुढच्या वेळी बघू," अशी थाप मारून कार्यकत्यांची बोळवण केली जाते. पण 'पुढची वेळ येईपर्यंत त्यांचा आत्मसन्मान मात्र संपवलेला असतो. पक्षनिष्ठा जपणारे कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मनात निराशा, राग आणि असहाय्यतेची भावना घर करून बसली आहे. 

विचारधारा बाजूला ठेवून निवडणूक जिंकता येईल, असा गैरसमज पसरवला जात आहे. पण विचारांशिवाय राजकारण म्हणजे सत्तेचा निर्लज खेळ असतो. 

आज निष्ठावंतांना बाजूला सारून विजय मिळवला, तर उद्या पराभवाच्या वेळी उभा राहणारा एकही कार्यकर्ता उरणार नाही. तेव्हा सोशल मीडियावरील पोस्ट, जाहिराती आणि नोटांची बंडले मतदारांकडून मतपेटीत मते टाकणार नाहीत. पक्षाची विचारधारा बाजूला ठेवून केवळ निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी ध्येयधोरणांना तिलांजली दिली जाते.तेव्हा कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळणे स्वाभाविक आहे. राजकारण हे केवळ सत्तेसाठीचे गणित नसते, ते भावना, निष्ठा आणि विश्वासावर उभे असते. हेच घटक दुर्लक्षित झाले, तर पक्षाच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकू लागते. हा प्रघात थांबला नाही, तर पक्ष राहतील, पण त्यांची मुळे सुकलेली असतील. कार्यकर्ते नसतील, तर संघटना नसेल. संघटना नसेल, तर लोकांशी नाळ तुटलेली असेल. आणि लोकांपासून तुटलेले राजकारण शेवटी स्वतः च्याच ओझ्याखाली कोसळते. दुर्दैवाची बाब म्हणजे हा प्रघात आता अपवाद राहिलेला नाही, तर नियम बनत चालला आहे. सत्ता आणि संख्याबळाच्या खेळात निष्ठावंत कार्यकर्ते हळूहळू हरवले जात आहेत

निवडणुकांमध्ये बंडखोरी होणे ही नवीन गोष्ट नाही, पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज बंडखोरी झाली, तर पक्षाकडे ती आवरण्याइतकी संघटनात्मक ताकद राहिलीच नाही. कारण  पक्षाविषयी निष्ठा,आस्था आणि पक्षाची विचारधारेची पक्षनेतृत्वांकडूनच सत्तेसाठी तिलांजली दिली जाते,तेव्हा कार्यकर्त्यांकडून निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. आपला नेताच जर स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी पक्षबदल करतांना बंडाळी करतात तेव्हा राजकीय करिअर करण्याच्या उद्देशाने आणि समाजसेवेचे व्रत घेतलेले कार्यकर्ते किती काळ तग धरतील हा प्रश्न निर्माण होतो.आपल्याच नेत्यांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन राजकीय अभिलाषा  बाळगणारे अपेक्षा भंग झाल्यावर बंड करणारच.

अशावेळी राजकीय पक्ष किंवा संघटना स्वकीयांकडूनच दुर्बल केली जाते तेव्हा पक्षहित म्हणजे नेमके काय, आणि ते कोणासाठी, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.हा प्रकार एखाद्या एका पक्षापुरता मर्यादित नाही, सगळेच पक्ष या रोगाने ग्रासलेले आहेत. सताधारी असोत वा विरोधक सर्वांनीच कार्यकर्त्यांना वापरून फेकण्याची नीती स्वीकारली आहे. मग बंडखोरी होते, नाराजी उसळते, आणि त्यावर "शिस्तभंगाची कारवाई" हा सोपा उपाय लावला जातो. पण प्रश्न असा आहे की आधी शिस्त कोणी मोडली? पक्षाशी गद्दारी आधी कार्यकत्यांनी केली की नेतृत्वाने ?

 स्थानिक पातळीवर घाम गाळणाऱ्यांना डावलून आयात नेत्यांना डोक्यावर बसवण्याची किंमत पक्षांना लवकरच मोजावी लागणार आहे.आज पक्षनेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. निष्ठा, संघटना आणि विचारधारा यांना पुन्हा केंद्रस्थानी न आणल्यास, उद्याच्या राजकारणात पक्ष उरतील, पण कार्यकर्ते नसतील. आणि कार्यकर्त्यांशिवाय राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा कोरडा खेळ.आता वेळ आली आहे सर्वांनीच..."उघडा डोळे बघा नीट" !

Post a Comment

0 Comments