Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये आता क्लस्टर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरात अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांमध्ये येत्या काळात मुंबई, ठाण्याप्रमाणे समुह विकास (क्लस्टर) योजनेचा पथदर्शी प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील सावळाराम महाराज अत्याधुनिक क्रीडासंकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केली.

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर

डाेंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात देशातील पहिले व्हर्टीकल स्पोर्ट संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इन डोअर आऊट डोअर इमारतीचे आणि सावत्रिबाई फुले नाट्य गृहाचे नुतनीकरणाचे काम याचे भूमीपूजन तसेच प्रेरणा वॉर मेमोरियल या स्मारकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश माेरे, सुलभा गायकवाड,  शिवसेना जिल्हा प्रमुख गाेपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम,  पद्मश्री गजानन माने आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

या योजनेच्या माध्यमांमधून लोकांना विविध प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध होतील. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या समुह विकास योजनांचा विकास आराखडा यापूर्वी तयार आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगवान हालचाली केल्या जातील. उद्याने, मैदाने, क्रीडांगण, वाहनतळ अशा सुविधा या प्रकल्पात उपलब्ध होतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एमएमआर विभागात समुह विकास योजनेतून ३५ माळ्यांच्या इमारती उभारल्या जात आहेत. घाटकोपर रमाबाई आंबेडकरनगरमध्ये १७ हजार घरांची समुह विकास योजना राबविण्यात आली आहे. लोकांसमोर आमचे भाडे कोण देईल. प्रकल्प कधी पूर्ण होईल, असे प्रश्न होते पण महायुती सरकारने लोकांच्या १०७ कोटीच्या भाड्याचा धनादेश देऊन तो प्रश्न सोडवून ही समूह विकास योजना पूर्ण केली, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


व्हिजन ठेऊन कामे केली की मग कोणतेही रिझन पुढे येत नाही, अशा शब्दाने आपण, आपले चिरंजीव खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे काम करत आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा क्षेत्रात सात ते आठ हजार कोटीची विविध प्रकारची विकास कामे सुरू आहेत. खासदारांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभे राहत आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने विकास कामांमध्ये फक्त गतिरोधक बांधण्याचे काम केले. ते महायुती सरकारने उखडून टाकून विकासाचा रथ गतीने पुढे चालविला आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एमएमआर विभागाची लोकवस्ती वाढत आहे. या क्षेत्राचा भविष्यकालीन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काळू धरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. धरण बाधित क्षेत्रातील वनजमिनीसाठी पाचशे कोटी एमएमआरडीएने भरणा करण्याची प्रक्रिया केली आहे. आपण देणारे आहोत, घेणाऱ्यांंमधील नाहीत. राज्याच्या विविध भागात विकास कामे आपण पाहत आहात, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण, डोंबिवलीतील पाणी योजना, सावळाराम महाराज भूखंडासंदर्भातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांना केल्या.

महायुती म्हणून समन्वयाने काम करत असल्याने एमएमआर विभागात विकासाची विविध प्रकारची कामे आता सुरू आहेत. सावळाराम क्रीडासंकुलाच्या माध्यमातून महसुल उपलब्ध होऊ शकतो हा प्रश्न उद्योग विभागान सोडवावा, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

खासदारांचे कौतुक

विकास कामांचा रेटा आणि स्वकर्तृत्वाने खासदार डाॅ. शिंदे आपल्या मतदारसंघात विविध विभागातून निधी आणत आहेत याचा आपणास वडील म्हणून अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी खासदार शिंदे यांचे कौतुक केले.



Post a Comment

0 Comments