. ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काशिफ तानकी यांना न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात आर्थिक गैरव्यवहार आणि चेक बाऊन्स प्रकरणी दोषी ठरवले असून, त्यांना कारावास आणि भारी दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कल्याण सत्र न्यायालयाने या प्रकरणात कडक भूमिका घेत स्पष्ट केले की, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर अधिक असते.
कल्याण सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आय. आर. शेख यांनी खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर काशिफ तानकी यांना तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला ३ लाख २ हजार २६० रुपये दंडही ठोठावला आहे. या निर्णयात असे म्हटले आहे की, जर दंडाची रक्कम भरली नाही, तर आरोपीला आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर अपिलाचा कालावधी संपताच ती रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडित कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
खटल्याच्या तपशिलानुसार, कल्याणचे रहिवासी आणि रेल्वेचे निवृत्त कर्मचारी सादिक उझ-झमान खान आणि माजी नगरसेवक काशिफ तानकी यांचे २००५ पासून संबंध होते. याच आधारावर सप्टेंबर २०२२ च्या सुमारास काशिफ तानकी यांनी आपली गरज सांगून सादिक उझ-झमान यांच्याकडून २ लाख ३८ हजार रुपये कर्ज म्हणून घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने आयसीआयसीआय बँकेचा एक धनादेश दिला होता, जो बँकेत जमा केला असता खाते बंद असल्यामुळे बाऊन्स झाला. कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम न भरल्यामुळे सादिक उझ-झमान यांनी न्यायालयात धाव घेतली. खटल्यादरम्यान सादिक उझ-झमान यांचे निधन झाले, त्यानंतर त्यांची विधवा पत्नी नौशाद खान आणि इतर वारसांनी हा कायदेशीर लढा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवला.
.jpg)
Post a Comment
0 Comments