3 वर्षांत उभारणार 50,000 झाडांचे घनदाट जंगल
ब्लॅक अँड व्हाईट (टिटवाळा) गीता गायकर /ऐनकर
कल्याण मधील टिटवाळ्यात केडीएमसी आणि भारत पेट्रोलियम कॉपॉरेशन लिमिटेडच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. येथे ३वर्षात 50,000 देशी झाडांचे एक मोठे आणि घनदाट जंगल उभे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात 30,000 देशी वृक्षांची 'मियावाकी' पद्धतीने लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नुकताच मांडा- टिटवाळ्यामध्ये प्रारंभ करण्यात आला आहे.दुसरा टप्पा हा २० हजार झाडांच्या लागवडीचा असेल. संपूर्ण जगभरात आपल्या अनोख्या मात्र तितक्याच परिणामकारक वृक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानचा 'मियावाकी' पॅटर्न केडीएमसीसाठी चांगलाच फायदेशीर ठरणार आहे.
एका बाजूला नाशिकमध्ये वृक्षतोडीचा विषय चर्चेत असताना, टिटवाळ्यात मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.या नवीन जंगलात वड, पिंपळ, कदंब, उंबर यांसारख्या देशी वृक्षांसह मसाला आणि आयुर्वेदिक झाडांचाही समावेश आहे. या संपूर्ण वृक्षारोपण प्रकल्पाचा खर्च भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) उचलत आहे, ज्यामुळे केडीएमसीला याकरिता एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.या वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा प्रारंभ केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, बीपीसीएलचे पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे, उपआयुक्त संजय जाधव आणि सावली संस्थेचे माने यांच्या उपस्थितीत करण्यात आला. येत्या वर्षभरात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 1,00,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील विविध मोकळ्या जागांवर ही झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली
मियावाकी जंगलाची वैशिष्ट्ये
लवकर वाढ : साधारण २०-३० वर्षांत संपूर्ण नैसर्गिक जंगल तयार होते.
घनदाट हरित वातावरण :जागा कमी लागते, पण झाडे जास्त वाढतात.
जैवविविधता वाढते : पक्षी, फुलपाखरे, छोटे प्राणी यांचे आश्रयस्थान होते.
हवामान सुधारते :प्रदूषण कमी होण्यास मदत, ऑक्सिजन वाढ.
पाण्याची धारण क्षमता वाढते :जमिनीची सुपीकता सुधारते.
कुठे उपयुक्त?
शहरांमध्ये,रिकामी / ओसाड जमीन,औद्योगिक परिसर, स्मशानभूमी, शाळा, बागा इ.
.jpg)


Post a Comment
0 Comments