ब्लॅक अँड व्हाईट विद्या कुलकर्णी (डोंबिवली)
डोंबिवलीतील सांस्कृतिक रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात “श्री. सुधीर फडके संगीत महोत्सव – २०२५” या दोन दिवसीय सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाची आज अत्यंत भावपूर्ण आणि सुरेल सुरुवात झाली. हा महोत्सव TOUCH – Turning Opportunities for Upliftment and Child Help या गेली तीन दशके आदिवासी, वंचित व बेघर मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन TOUCH बालग्रामचे संगीत शिक्षक श्री. भारत पवार, TOUCH बालग्रामचे विद्यार्थी, सुप्रसिद्ध गायक श्रीधरजी फडके तसेच TOUCH संस्थेचे विश्वस्त श्री. प्रविण रेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी श्रीधरजी फडके यांनी सादर केलेल्या “गीत रामायण” या अविस्मरणीय कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. रामकथेचे संगीतबद्ध सादरीकरण अनुभवताना संपूर्ण मैदान भक्तीरसात न्हाऊन निघाले. गीतरामायणातील प्रत्येक प्रसंगाला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या संगीत महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच समाजातील दुर्लक्षित घटकांतील मुलांच्या शिक्षण, संगोपन व सर्वांगीण विकासासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता पूर्णतः सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक जोशी, प्रसन्न मोहरे, निशांत श्रीधरन आणि प्रफुल पालांडे हे विशेष परिश्रम घेत असून त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे आजचा पहिला दिवस अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी Cipla, Alvita Pharma, State Bank of India (SBI), Full Circle Textiles, Pitambari, Kesari Tours तसेच St. Joseph High School यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments