Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

फळांचा रंग

फळ पिकल्यानंतर त्यांचा रंग का बदलतो? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो त्याची सोपी उत्तरे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

झाडावर लागलेली फळे सुरुवातीला बहुतेक वेळा हिरवी असतात. पण जसजशी फळे पिकू लागतात, तसतशी त्यांच्या रंगात बदल होतो. उदाहरणार्थ, कच्चा केळीचा रंग हिरवा असतो पण पिकल्यावर पिवळा होतो, कच्चे आंबे हिरवे असतात पण पिकल्यावर पिवळे किंवा लालसर होतात.फळांचा रंग बदलण्यामागे मुख्य कारण म्हणजे रंगद्रव्यांमधील (Pigments) होणारे बदल.कच्च्या फळांमध्ये हरितलवके  (क्लोरोफिल) नावाचे हिरवे रंगद्रव्य जास्त असते. हेच रंगद्रव्य पानांना हिरवा रंग देते. फळ पिकू लागल्यावर हे क्लोरोफिल हळूहळू नष्ट होते.क्लोरोफिल नष्ट झाल्यानंतर फळांमध्ये आधीपासून असलेले किंवा नवीन तयार होणारे रंगद्रव्य दिसू लागतात, जसे की –

1) कॅरोटीन – ज्यामुळे फळांना  पिवळा किंवा केशरी रंग येतो.

2) ऍन्थोसायनिन –ज्यामुळे फळांना लाल, गुलाबी किंवा जांभळा रंग येतो.

3)झॅन्थोफिल – यामुळे फळांना  फिकट पिवळा रंग येतो.

उदा. केळी.

 ज्यावेळी फळांचा रंग बदलतो म्हणजेच ती पिकतात त्यावेळी फळांमध्ये साखरेचे प्रमाण वाढते, फळ गोड होते आणि त्याचा वास व चव बदलते.फळांचा रंग बदलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, यामुळे आपल्याला कळते फळ पिकले आहे आणि खाण्यास तयार आहे. यामुळे प्राणी आणि माणसे फळे ओळखतात आणि खातात, त्यामुळे बी पसरायला मदत होते.


 परंतु हल्ली जास्त नफा मिळवण्यासाठी बाजारात फळांना कृत्रिम रित्या पिकवले जाते त्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा, रंगद्रव्यांचा वापर केला जात असतो. यापैकी अनेक रसायनांचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम दिसून येत असतो.

1. कॅल्शियम कार्बाईड-

हे स्वस्त व बेकायदेशीर रसायन आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते इथिलीनसारखा वायू तयार करते.

2. कृत्रिम इथिलीन स्प्रे किंवा गॅस-

काही ठिकाणी योग्य प्रमाणात वापरले जाते, पण अति वापर हानिकारक ठरतो.

कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांमुळे होणारे दुष्परिणाम-  

डोकेदुखी, मळमळ, उलटी होऊ शकते.

पोटदुखी व पचनाचे त्रास होतात

लहान मुलांवर व गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतात.

दीर्घकाळ सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

फळांचा रंग बदलणे हे नैसर्गिक रंगद्रव्ये व हार्मोन्स यांमुळे घडते. मात्र, फळे लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी कृत्रिम हार्मोन्स व रसायने आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे शक्यतो नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे खाणे अधिक सुरक्षित आहे.

लेखन- सौ. वैभवी स्वानंद तरटे.

Post a Comment

0 Comments