Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शहराचा विकास जलद गतीने पारदर्शक व नियोजीत पध्दतीने होण्यासाठी केडीएमसीचे पुरोगामी पाऊल

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या KD SWIFT या प्रणालीचा शुभारंभ आज करण्यात आला. शहराचा विकास जलद गतीने पारदर्शक व नियोजीत पध्दतीने होण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करीत असल्याची, माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
हा कार्यक्रम महापालिका अधिकारी वास्तुविशारद, एमसीएचआय अध्यक्ष व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.



महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रथमच KD SWIFT म्हणजेच SINGLE WINDOWS INTEGRATED FACILITATION TOOL ही प्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत BUILDING PERMISSION MANAGEMENT SYSTEM बरोबरच सर्व प्रकारचे "नाहरकत दाखले" म्हणजेच अग्निशमन विभागाचा नाहरकत दाखला, पाणी पुरवठा विभागाचा नाहरकत दाखला, जनि:/मनि: विभागाचा नाहरकत दाखला, उद्यान विभागाचा नाहरकत दाखला, कर विभागाचा नाहरकत दाखला इ. एक खिडकी योजना या प्रणालीद्वारे उपलब्ध होतील. तसेच या प्रणालीमध्ये डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरीकांना आणि विकासकांना आपल्या अर्जाचे REAL TIME TRACKING करता येणार आहे. त्यामुळे ही प्रणाली विकासकांसह, नागरीकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.



महापालिकेतील विविध प्रकारच्या विकास परवानग्या करीता शासनाने बीपीएमएस प्रणाली विकसित केलेली आहे. मात्र याकरीता आवश्यक "ना हरकत दाखले" हे विहीत कालावधीत तसेच एकाच प्लॅटफॉर्म वरुन कसे देता येतील, या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे संकल्पनेतून ही प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. याकरीता शासनाचे बिपीएमएस विभागाने केलेले सहकार्य तसेच यासाठी वास्तुविशारद, एमसीएचआय तसेच महापालिका नगररचना विभागाचे सहा.संचालक नगररचना संतोष डोईफोडे, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपआयुक्त समिर भुमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या नविन प्रणालीमुळे कोणत्याही नाहरकत दाखल्यासाठी व्यक्तीश: महापालिकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाला ठरावीक कालमर्यादेत अर्जावर निर्णय देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रमाणपत्रावर अधिकृत क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्याची सत्यता तात्काळ तपासता येईल. अर्ज दाखल केल्यानंतर 28 दिवसांत नागरीकांना आवश्यक परवानग्या प्राप्त होऊ शकतील.

BPMS आणि SWIFT या दोन्ही प्रणाली यशस्वीरित्या राबविणारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका ठरणार आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले. 

जास्तीत जास्त नागरीकांनी या प्रणालीचा वापर करुन, महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments