Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

समाजाला सृजनात्मक दृष्टी प्रदान करण्याचे कार्य साहित्य करते-... अतुल लिमये


  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण प्रतिनिधी 

समाजाला रचनात्मक आणि सृजनात्मक दृष्टी प्रदान करण्याचे कार्य साहित्य करीत असते,असे मत रा.स्व.संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय साहित्य परिषदेचे सतरावे अधिवेशन ‘रीवा’ मध्यप्रदेश येथे नुकतेच पार पडले. या संमेलनाच्या समारोप प्रसंगी लिमये बोलत होते. या अधिवेशनात महाराष्ट्रातील हिंदी, मराठी अशा ४० साहित्यिकांनी सक्रीय सहभाग नोंदवला. या संमेलनात कोल्हापूर, मुंबई, कल्याण, ठाणे, नवी मुंबई, बीड, धाराशिव, लातूर, नागपूर, धुळे, पुणे अशा विविध भागातील हिंदी, मराठी विविध पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. या अधिवेशनाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्घाटन केले. तर आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते.

लिमये म्हणाले, सध्या समाजमाध्यमे आणि काही विशिष्ट लेखकगट भारतीय जीवनमूल्ये आणि संस्कारांना कमी लेखून नकारात्मक विचारांची पेरणी समाजात करीत आहे. भारतीय साहित्याला आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राला अशा समाजविघातक शक्तीपासून वाचविण्याचे आणि नवी दिशा देण्याचे कार्य अखिल भारतीय साहित्य परिषदेने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्घाटन सत्रात विश्वासराव पाटील यांनी वाचन,संस्कृती, साहित्य, कादंबरी लेखन, अधिवेशन व साहित्य संमेलन यावर आपले विचार मांडले. 

या अधिवेशनात साहित्य अकादमीचे प्रा. नरेंद्र पाठक, दूरदर्शनचे पूर्व अधिकारी नितीन केळकर, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बळीराम गायकवाड, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे निदेशक डॉ. राहूल मिश्रा, महाराष्ट्र हिंदी साहित्य अकदामीचे डॉ. दिनेश प्रताप सिंह, डॉ. पुरूषोत्तम पाटील, बहिणाबाई पुरस्कार विजेते डॉ. संजीव गिरासे, कादंबरीकर व अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेले मनोहर मंडवाले, नवी मुंबईच्या कल्पना देशमुख, ठाण्याच्या नंदा कोकाटे, साहित्यिका माधूरी सिंह, रामकृष्ण सहस्त्रबुध्दे, सत्यभामा सिंह, राजभाषा समिती सदस्य प्रविण देशमुख, लेखक शिवकुमार सिंह, संजय द्विवेदी अशा अनेक साहित्यिकांचा अधिवेशनात सहभाग होता. कवी संमेलन, प्रदर्शनी व इतर कार्यक्रमांत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. या संमेलनाच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राच्या पथकाने परिधान केलेला महाराष्ट्रीयन पोशाख, हातात मराठी भाषा विषयक फलक, महाराष्ट्रगीत, फुगडय़ा यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

‘आत्मबोध से विश्वबोध’ हे घोषवाक्य असलेल्या या संमेलनात अनेक पद्मश्री विजेत्या साहित्यिकांनी आपले विचार मांडले. या अधिवेशनाचा समारोप रा.स्व.संघ सहसरकार्यवाह अतुल लिमये, पूर्व संघटन मंत्री साहित्यिक श्रीधर पराडकर यांनी केला. या अधिवेशनात आगामी तीन वर्षासाठी साहित्यिक डॉ. सुशीलचंद्र त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील सर्व प्रातांचा समावेश असलेल्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यात कल्याणचे डॉ. दिनेश प्रताप सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष व निकिता भागवत यांची केंद्रीय प्रचार विभाग सदस्य म्हणून, तर लखनसिंह कटरे यांची बोलीभाषा समितीवर निवड करण्यात आली. भारतीय एकात्मतेचा संदेश देणारे हे अधिवेशनात मोठय़ा उत्साहात पार पडले. 

याप्रसंगी 'आत्नबोध से विश्वबोध' या त्रैमासिक पत्रिकेचे प्रकाशन ही करण्यात आले. या पत्रिकेत कल्याणचे साहित्यिक डॉ. दिनानाथ पाटील यांचा 'भारतीय परिवेश में आत्मबोध से विश्वबोध' या शोधालेखाचाही समावेश करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments