भाजपा कल्याण जिल्हा निवडणूक प्रमुख
नरेंद्र सूर्यवंशी यांच्या शिष्टमंडळाने घेतली
उपायुक्तांची भेट
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक प्रक्रियेला गती आली असून निवडणूकीच्या तारीखा जाहीर होण्या पूर्वी राजकीय धुळवड रंगली आहे. मतदार यादी मधील नावे दुसऱ्याच प्रभागात तर प्रभागांचे अंतरिम सिमाकंन होऊन देखील मतदारांची नावे दुसर्या प्रभागात, पँनलमध्ये असल्याबाबत भाजपाने या मतदार यादीबाबत तीव्र आक्षेप घेतला असून भाजपा कल्याण जिल्हा निवडणूक प्रमुख भाजपा नरेंद्र सूर्यवंशी, टिटवाळा भाजपा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक विभाग उप आयुक्त समीर भुमकर यांची भेट घेऊन हि बाब निदर्शनास आणली आहे.
आता पर्यत विरोधी पक्षांनी केडीएमसी निवडणूक यादीत घोळ असल्याचा आरोप करत हरकती घेतल्या होत्या पण आता सत्ताधारी भाजपनेही याद्यातील नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्याची हरकत घेतली आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उचलल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यादीत मोठ्या प्रमाणावर हेरफेर झाल्याचा आरोप भाजपचे कल्याण-डोंबिवलीचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी केला आहे. पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी जाणून-बुजून चुकीचे फेरबदल केले, असा सनसनाटी दावा त्यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर बोलताना केला.
सूर्यवंशी यांनी सांगितले की, एका प्रभागाच्या सीमेत येणारी हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. ही केवळ चुकून झालेली किंवा अपघाती चूक नसून जाणून-बुजून केलेला गैरप्रकार असल्याच त्यांनी सांगितले . भाजपला निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सर्व चुका तातडीने दुरुस्त कराव्यात. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू. निवडणूक पारदर्शक वातावरणात झाली पाहिजे, आणि जर या तक्रारी दखल घेतल्या नाहीत, तर भाजपकडून पुढील पावले उचलली जातील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
त्याच बरोबर पॅनल क्रमांक ३ मधील १५ ते १६ हजार नावांचा घोळ झाला आहे. जुना प्रभाग क्र. ९ टिटवाळा यामध्ये स्टेशन परिसर कोणत्याही सिमेवर नसतांना येथील सर्व याद्या पॅनल क्रमांक ४ मोहने आटाळी मध्ये टाकल्या आहेत. दोन ते तीन किलोमीटरचे अंतर असतांना देखील या याद्या त्या प्रभागात टाकल्या असल्याचे मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी सांगितले. तर या घोळामागे विरोधक देखील असण्याची शक्यता भोईर यांनी वर्तवली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments