Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राष्ट्रवादीच्या अर्जुन चौधरी यांचा भाजपात प्रवेश

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवलीत झालेल्या राजकीय हालचालींचे 'सर्जिकल स्ट्राईक' ताजे असतानाच, आता कल्याण ग्रामीण मतदारसंघातही भाजपचे ऑपरेशन लोटस सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील राहीलेले रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आल्यानंतर ठाणे जिल्हा हा त्यांचा प्रभावक्षेत्र ठरु लागला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून  कल्याण लोकसभा क्षेत्रात स्वतः रवींद्र चव्हाण भाजपला सर्वात पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाणवते.

त्याच अनुषंगाने स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा इनकमिंग सत्र सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश घेतांना दिसत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि कल्याण ग्रामीण मधील प्रतिष्ठित आणि जेष्ठ समाजसेवक अर्जुन चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक व इतर नेत्यांच्या उपस्थितीत अर्जुन चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव विजय चौधरी, सून मृणाली चौधरी, मुलगा अजिंक्य चौधरी, संतोष चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 


"राष्ट्रवादी पक्षात नेहमी सन्मानजनक वागणूक मिळाली मात्र जनतेच्या विकासासाठी मी भाजपात प्रवेश केला " असं श्री.अर्जुनबुवा चौधरी यांनी म्हटले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडी शिगेला पोहोचली आहे. राज्यात दोन्ही पक्ष महायुतीमध्ये असले तरी, स्थानिक पातळीवर आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना धक्के दिले जात आहेत.

Post a Comment

0 Comments