Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बदलापूर पालिका निवडणुकीत प्रस्थापितांची प्रतिष्ठापणाला लागली

     

                  ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर

आतुरतेने वाट पाहत बसलेल्या सर्व राजकीय धुरिणांची दीर्घ प्रतिक्षा आता संपली आहे.काही दिवसांत होणाऱ्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला आता खरा रंग यायला सुरुवात झाली आहे.अर्ज छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, ४९ जागांसाठी एकूण १६३ उमेदवार रिंगणात कायम आहेत. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या सहा अर्जांपैकी वंचित बहुजन आघाडीच्या रश्मी गव्हाणे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता पाच दमदार उमेदवार नगराध्यक्षपदासाठी थरारक शर्यतीत उतरले आहेत.

 सध्याची स्थिती पाहता लढत चांगलीच चुरशीची होणार असल्याचे दिसते आहे.या निवडणुकीत भाजप व शिंदे गटदेखील स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे राजकीय गणिते काय उत्तरे मांडतील या बद्दल मोठी अनिश्चितता  निर्माण झाली आहे.

नगराध्यक्षपदाच्या पाचही उमेदवारांची जोरदार तयारी पाहता बदलापूरची ही लढत अत्यंत रोमहर्षक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर असल्याने, रिंगणातील उमेदवारांची अंतिम संख्या किती होते याकडे आता बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी

 शिवसेने तर्फे सौ.वीणा म्हात्रे

 भाजप-राष्ट्रवादी (युती)तर्फे रुचिता घोरपडे

 महाविकास आघाडीच्या प्रिया गवळी

आम आदमी पार्टी (आप) आस्था मांजरेकर

अपक्ष म्हणून संगीता चेंदवणकर

निवडणूक आणि नात्या गोत्याचं राजकारण तसं नाही, कुठे पती-पत्नी तर कुठे पिता-पुत्र, कुठे दीर-भावजय तर कुठे भाऊ-भाऊ असं चित्र पाहायला मिळतं. बदलापूर नगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 दाम्पत्य मैदानात उतरले आहेत. महत्वाचं म्हणजे ही 11 जोडपी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांमधली आहेत. त्यातही शिवसेना शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी देण्यात आलीय.

भाजपकडून गटनेते राजेंद्र घोरपडे आणि नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी रूचिता घोरपडे, भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला संभाजी शिंदे, शहराध्यक्ष रमेश सोळशे आणि हर्षदा सोळसे, माजी शहराध्यक्ष शरद तेली आणि कविता तेली, सुरज मुठे-संध्या मुठे, सागर घोरपडे-निशा घोरपडे अशा 6 दांपत्याना उमेदवारी देण्यात आलीय.   

तर शिवसेना शिंदे गटाकडून शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि विणा म्हात्रे, त्यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे आणि त्यांची पत्नी उषा म्हात्रे, प्रवीण राऊत-शीतल राऊत, श्रीधर पाटील-स्वप्ना पाटील, जयश्री भोईर - मुकुंद भोईर यांना उमेदवारी मिळालीय. याशिवाय वामन म्हात्रे यांचे पुत्र वरूण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे हे देखील उमेदवार आहेत. तर रासपकडून रुपेश थोरात आणि सुषमा थोरात मैदानात आहेत.

बदलापूर शहरात नात्या-गोत्यांच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर शिवेसेना-भाजपच्या नेत्यांनी मात्र आधीचा अनुभव, प्रभागात केलेलं काम आणि निवडून येण्याची क्षमता या आधारावरच उमेदवारी दिली जात असल्याचं सांगत पती-पत्नी आणि नात्या-गोत्याच्या राजकारणाचं समर्थन केलंय.

उमेदवारांच्या यादीतील जवळपास 90 टक्के उमेदवारांनी याआधी नगरसेवक म्हणून काम केलंय.

बदलापूरच्या राजकारणात आतापर्यंत म्हात्रे, घोरपडे, राऊत, पाटील कुटुंबियांचाच वरचष्मा राहिलाय. त्यामुळे या ही वेळी संभाव्य उमेदवारांनी बाजी मारली तर पालिकेच्या सभागृहात 12 जोडपी आणि एकाच कुटुंबातील 6 जण शहराचा गाडा हाकताना पाहायला मिळतील. 

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये काही प्रमाणात बंडखोरीची लागण महत्वाच्या पक्षांना झाली आहे. काही ठिकाणी अपक्ष रिंगणात आहेत. असे असले तरी प्रत्येक पक्षाला आपल्या विजयाची खात्री दिसून येत आहे.त्याच अनुषंगाने बुधवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत  श्री वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून काँग्रेसचे संजय जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही गळाला लावले आहे. या प्रवेशामुळे बदलापूर शहरात शिवसेनेची ताकद वाढविण्याचं महत्त्वाचा काम वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून घडले आहे.परंतू  याचा किती फायदा होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

याबाबत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ... बदलापूर शहरासाठी शिवसेनेच्या माध्यमातून गल्लीबोळात विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून,शिवसेनेचे तत्कालीन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुरातील विकासकांना सढळ हाताने मोठी मदत केली आहे.ही बाब बदलापुरातील जनता विसरणार नाही. त्यामुळे विकासकामे करणाऱ्या शिवसेनेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील,मागच्या वेळी बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती.बदलापुरातील जनता सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहिली आहे.ह्या वेळीही शिवसेनेचे जास्तीत जास्त  नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यरत आहोत." असा निर्धार वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला.

एकंदरीतही निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसलीय. मात्र या निवडणुकीत पुन्हा एकदा नात्यागोत्याचं राजकारण पाहायला मिळतंय.

Post a Comment

0 Comments