पालकांचे ऐकून नव्हे; त्यांच्या प्रत्यक्ष वर्तणूकीतून मुले संस्कार प्राप्त करतात'
.....वक्ते गणेश शिंदे
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
असं करु नको, तसं करु नको, हेच कर, तेच कर असं पालक मुलांना कितीही सांगत असले तरीही आपले पालक कसे वागतात हे मुलं नेहमीच पाहत असल्याने ती त्यातूनच कसं वागायचं हे आपल्या मनात बिंबवत असतात व त्या प्रकारेच वागतात असं प्रतिपादन सुप्रसिध्द वक्ते गणेश शिंदे यांनी केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त शिवतुतारी प्रतिष्ठान व मराठा समाज नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा शक्ती हिच राष्ट्र शक्ती' ' या विषयावर शिंदे यांचे व्याख्यान मराठा भवन येथे ठेवण्यात आले होते.
आपल्या राज्यात अन्य भाषकांनी येऊन विविध व्यवसाय-उद्योगांमध्ये यश मिळवून दाखवले; मग मराठी युवकांमध्ये काय कमी आहे, असा सवाल करुन शिंदे म्हणाले की आपल्याकडील पालकांनी नोकरीवादी मानसिकता मराठी मुलांवर बिंबवल्यामुळे आपली मुले जोखीम न घेता सुरक्षित, संरक्षित नोकऱ्या निवडत आहेत. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे विदेशियांना समजून चुकले; पण मग आपल्या मुलांनीही विक्री कौशल्य, उद्योग-व्यवसायांमधील बारकावे जाणून घ्यावेत व ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन' अशा ताकदीने आपलीही जागा बनवावी असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडणाऱ्या युवावर्गाकडे अंगुलीनिर्देश करताना युवकांमधील, शालेय विद्यार्थ्यांमधील व्यसनासक्ती वाढत चालली असून पालकांनी मुलांच्या महागड्या शिक्षणाचा खर्च करुन मुकाट राहु नये; मुलांची दप्तरेही तपासावीत, त्यांच्या संगतीचाही आढावा घेत राहावे अशी सूचनाही शिंदे यांनी केली.
याप्रसंगी विचारमंचावर शाम महाडिक, उद्योजक गिरीश खंडागळे, ज्योती माळी हेही उपस्थित होते. अमरजा चव्हाण प्रास्ताविक यांनी केले. ‘शिवतुतारी'चे निर्मिती सूत्रधार प्रा. रविंद्र पाटील यांनी शिंदे यांचा परिचय ओघवत्या भाषेत करुन दिला.
.jpg)



Post a Comment
0 Comments