काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी प्रकाश पगारे यांना घेतले खांद्यावर......
भाजपा पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवून पगारे यांना केले होते अपमानित...!
आरोपींवर अट्रोसिटी गुन्हा दाखल न केल्याने काँग्रेसचे डीसीपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
काँग्रेस हा कार्यकर्त्यांच्या भरोवशावर उभा असलेला पक्ष असून प्रकाश पगारे आणि सर न्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याची विचारधारा एकच आहे. लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असून संविधानिक वस्त्रे घालून लोकशाही वाचवू असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कल्याणमध्ये केले.
काही दिवसांपूर्वी प्रकाश पगारे यांना भाजपा जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्या प्रकरणी साडी नेसवून अपमानित केले होते. यानंतर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी भाजपा पदाधिकारी यांच्यावर अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल न करता फक्त अपमानित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ आणि भाजपा पदाधिकारी यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये डीसीपी कार्यालयासमोर कॉंग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश पगारे यांना खांद्यावर उचलून गौरव केला. यावेळी सपकाळ यांनी पगारे यांना कोट, गांधी टोपी घालून भगवान गौतम बुद्धांची मुर्ती आणि संविधांनाची प्रतिमा भेट दिली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव नवीन सिंह, प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जपजित माटा, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, शकील खान, मुन्ना तिवारी, विमल ठक्कर, प्रवीण साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांकडून संविधानाऐवजी ठोकशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून, काँग्रेस पक्ष हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष आहे. “आम्ही केवळ सत्तेचे हस्तांतरण केले नाही, तर व्यवस्था परिवर्तनाचा हेतू ठेवून सत्ता चालवली. आम्ही लोकशाही आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा सदैव आदर केला,” असेही सपकाळ यांनी सांगत प्रकाश पगारे यांच्या अपमानप्रकरणी संबंधितांवर ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
.jpg)




Post a Comment
0 Comments