Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, चांदवड, सिन्नर मधुन येणाऱ्या फुलांच्या गाड्यांवर बंदी घालण्याची मागणी

 
                       ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
ऐन सणाच्या वेळेस कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाशिक, चांदवड, सिन्नर येथुन फुलांच्या गाडया येत असून त्यामुळे येथील बारामाही व्यवसाय करणारे शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. म्हणून बाजार समितीने बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर बंदी घालावी अशी मागणी फुल मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ नरवडे, फुल मार्केट व्यापारी संघटनेचे  मधुकर मासेरे, सचिन सईद, बाळू गायकवाड, अतुल धुमाळ आदींसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात फुल मार्केट आहे. येथे ठाणे जिल्ह्यातील व आजुबाजूच्या परिसरातील शेतकरी व व्यापारी फुलांचा व्यवसाय करीत आहेत. याबाबत फुल मार्केट व्यापारी संघटनेचे बाळू गायकवाड यांनी सांगितले की,  गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही फुलांचा व्यवसाय बारामाही करीत आहे. या भागातील शेतकरी व व्यापारी आम्हाला बारामाही फुले पुरवितात, परंतु सणाच्या वेळेस म्हणजे गौरी गणपती, दसरा व दिवाळी इतर सणांच्या वेळेस नाशिक, चांदवड,व सिन्नर येथील एजंट व्यापारी फुलांच्या चारशेच्या आसपास गाडया घेऊन रात्री येतात. बाजार समितीच्या आवारात गाड्या लावतात तर काही रोडवर गाड्या लावतात.


त्यामुळे रहदारीला त्रास होतो, तसेच वाहतूक कोंडी होते. हे बाहेरचे व्यापारी ऐन सणासुदीच्या वेळेस गाड्या घेऊन येतात. त्यामुळे येथे बारामाही व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवसावर मोठा परिणाम होतो. कारण सणासुदीच्या दिवसांत चांगला व्यवसाय होत असताना हे बाहेरून येणारे एजंट चार दिवसांत मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात. म्हणून बाजार समितीच्या संचालक मंडळानी दखल घेऊन स्थानिक शेतकरी व व्यापारी यांच्यावर होणारा अन्याय दुर करावा व नाशिक, चांदवड, सिन्नर येथील येणाऱ्या फुलांच्या गाड्यांवर बंदी घालावी असे सांगितले.

Post a Comment

0 Comments