ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
"कल्याणमधील के. सी. गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा समोर आला आहे. विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा किंवा टिकली लावू नका, राखी किंवा धार्मिक धागा बांधून शाळेत आलात तर कारवाई होईल, असा फतवा शाळा प्रशासनानं काढल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आल आहे. या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळेवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी केडीएमसी शिक्षण मंडळाकडे केली आहे. यानंतर शिक्षण मंडळाने या शाळेला नोटीस बजावली आहे. तर आम्ही कुठला फतवा काढला नाही, शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे.
कल्याण मधील "कल्याण एज्युकेशन सोसायटीच्या" 'श्रीमती कांताबेन चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूल'ने एक अजब फतवा काढला आहे. शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कपाळावर टिळा लावल्यास अथवा हातात राखी बांधल्यास मारहाण करण्यात येते. त्यांना जोर जबरदस्तीने टिळा पुसायला लागतो आणि यापुढे टिळा लावल्यास शिक्षा देण्याची धमकी दिली जाते. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अनेक पालकांच्या तक्रारी आल्या असल्याचे निवेदन ठाकरे गटाचे रुपेश भोईर यांनी केडीएमसी शिक्षण मंडळाला दिले.
या विषयावर त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई पुढील सात दिवसांच्या आत करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भोईर यांनी दिला होता. त्यानुसार केडीएमसी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी याबाबत शाळेला नोटीस काढत या प्रकाराबाबतचा सविस्तर खुलासा सादर करण्यास सांगितले. याबाबत या शाळेत आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि काही पालक उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे गट आक्रमक होत आम्ही इतर धर्माला सांगतो का टिळा किंवा टिकली लावा, त्यांच्यासाठी आमच्या धर्मावर बंदी का ? असा सवाल करत आम्ही सर्व धर्माचा आदर करतो असे सांगत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला.
तर आम्ही कुठला फतवा काढला नाही, शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. कडा व बांगडीने इजा होऊ नये यासाठी आम्ही ते बंद केलेले आहे. त्याचबरोबर टीळा धागे यामुळे शाळेत धार्मिक वाद होत असल्याने त्यादेखील काढाव्या अशा सूचना आम्ही पालकांना दिल्या असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
.jpg)



Post a Comment
0 Comments