ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे सरोवरातील (शेनाळे तलाव) नौका विहाराच्या सुविधेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आता महापालिकेकडून या ठिकाणी फ्लोटिंग ब्रीज, कारंजे, उपहारगृह, लेझर शो, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा अशा विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच तलावाभोवती जॉगिंग ट्रॅक व्यायामासाठी विशेष जागा, वरिष्ठ नागरिकांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे . नागरिकांना सायंकाळी नौका विहार करतांना बोटीत बसूनच नयनरम्य लेझर शो आणि म्युझिकल फाऊंटनचा आनंद उपभोगता येणार आहे. सिटीपार्क पाठोपाठ प्रबोधनकार ठाकरे सरोवर हे आता पूर्ण कुटुंबाला एकत्र फिरण्यासाठी एक निसर्गरम्य व रमणीय स्थळ ठरत आहे.
या सरोवराच्या ठिकाणी सकाळ,संध्याकाळ फिरायला येणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येत्या नववर्षात नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याबरोबरच प्रबोधनकार ठाकरे सरोवर परिसरात सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. या तलावाच्या जॉगिंग ट्रकवर मॉर्निंग वॉकसाठी येणा-या काही नागरिकांकडून येथील सौंदर्यीकरणाला गैरसमजुतीमुळे विरोध होत होता. तथापि जॉगिंग ट्रॅकच्या सुविधेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता, तलाव परिसराच्या सौंदर्यीकरणाला कोणतीही बाधा न आणता अधिक चांगल्या सुविधा देखील नागरिकांना उपलब्ध दिल्या जाणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.
सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत प्रबोधनकार ठाकरे सरोवर नागरिकांसाठी खुले राहणार असून येथील विविध सुविधांमुळे आणि सौंदर्यीकरणामुळे नागरिकांना आरोग्यदायी जीवनासाठी आणि विरंगुळयासाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे , यामुळे कल्याण शहरातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments