सर्व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह
कार्यकर्त्यांचा सहभाग
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सर्पदंशामुळे डोंबिवलीतील एक चिमुकली मुलगी आणि तिच्या मावशीला योग्य उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे हे जीव गेल्याचे आरोप करत नागरिकांचा संताप उसळला आहे. शहरांतील सर्व विरोधी पक्षांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून रुग्णालय प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाविरुद्ध जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे, मनसेचे प्रकाश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर प्रमुख भालचंद्र पाटील, सत्यवान म्हात्रे व पीडितांच्या नातेवाईकांनी आवाज उठवला. या आंदोलनाला सर्व पक्षीय नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. 
शास्त्री नगर रुग्णालयातील ज्या जबाबदार अधिकारी आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हे दोन मौल्यवान जीव गमावले, त्यांच्यावर त्वरित आणि कठोरतम कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुःखद घटना थांबवता येतील अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तर संबंधितांवर लवकर कारवाई न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 
रुग्णालयातील उपचारातील दुर्लक्ष आणि औषधांच्या अभावामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अलीकडेच खांबळपाडा येथील दोन निरागस मुलींचा सर्पदंशानंतर योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज सामान्य नागरिकांनी शास्त्रीनगर रुग्णालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन केले. रुग्णालयात आवश्यक औषधे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत. आपत्कालीन सेवा सक्षम कराव्यात. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उपस्थित नागरिक, पक्षनेते आणि पत्रकारांशी संवाद साधत आश्वासन दिले की, या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई होईल. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालयावर प्रशासन नियंत्रण ठेवले जाईल असे सांगितले.
.jpg)



Post a Comment
0 Comments