३३८१ अंगणवाडी सेविकांचा सहभाग
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
महिला व बालविकास विभागांतर्गत “पोषण भी पढ़ाई भी” या राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना बाल पोषण, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण बालविकास विषयक सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी दि. ६ ऑक्टोबर २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला असून, एकूण ३३८१ अंगणवाडी सेविका या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.
ठाणे जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन
ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १७ एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) प्रकल्पांतील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे नियोजन प्रती बॅच १०० (जास्तीत जास्त १०५) सेविका या प्रमाणे केले असून, प्रत्येक बॅचमध्ये पोषण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व बालसुरक्षा यांसारख्या विषयांवर सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन दिले जात आहे.
प्रशिक्षणाचे उद्दिष्ट
“पोषण भी पढ़ाई भी” या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे —
अंगणवाडी सेविकांना बाल पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि शैक्षणिक क्रियाकलापांवरील अद्ययावत माहिती व कौशल्य देणे,
शालेयपूर्व शिक्षणासह बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सेविकांची कार्यक्षमता वाढविणे,आणि ग्रामीण व शहरी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अंगणवाडी प्रणाली सशक्त करणे.
प्रशिक्षणाचे आयोजन
प्रशिक्षणाचे आयोजन ठाणे जिल्हा परिषदेतर्फे संबंधित प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून करण्यात आले आहे. प्रशिक्षण स्थळी सेविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, विषयतज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जात आहे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास), जिल्हा परिषद ठाणे संजय बागुल यांनी सांगितले की, “पोषण भी पढ़ाई भी प्रशिक्षण सध्या ठाणे जिल्ह्यात यशस्वीपणे सुरू आहे. अंगणवाडी सेविकांना नवीन कौशल्ये व कार्यपद्धतींचे प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षमी केले जात आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.”
“पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ठाणे जिल्ह्यातील बालविकास आणि शिक्षण क्षेत्रात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे या माध्यमातून अंगणवाडी सेविकांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण सेवा आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments