ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एमआयडीसीने पाणी दरात दर युनिट मागे एक ते पावणे तीन रुपयाने वाढ केल्याने त्याचा फटका महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आणि उद्योगाला बसणार असून त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने परिपत्रक काढून दिनांक 01/09/2025 पासून महाराष्ट्रातील सर्व निवासी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी दरात वाढ केल्याचे नमूद केले असून प्रती युनिट निवासी साठी एक रुपया, औद्योगिक साठी पावणेतीन रुपये अशी पाणी दरात वाढ झाली आहे. निवासीचा सद्याचा दर प्रती युनिट दर रुपये 8.25 असा आहे तो आता रुपये 9.25 होणार आहे. औद्योगिक साठी पाण्याचा दर रुपये 22.50 असा होता तो आता रुपये 25.25 प्रती युनिट असा होईल. औद्योगिक क्षेत्रात जे कच्चा माल करीता पाणी वापर करीत असतात त्यांना रुपये 28.25 इतकी प्रत्येकी युनिट मागे वाढ केली गेली आहे. त्यांचा पाण्याचा दर हा रुपये 85 ते 88 असा प्रती युनिट होईल.
हे परिपत्रक काल व आज स्थानिक डोंबिवली एमआयडीसी कार्यालय कडून देण्यात आले आहे. त्या परिपत्रकावर तारीख 11/09/2025 रोजीची आहे तर सर्व महाराष्ट्र साठी मुंबई येथील मुख्य कार्यालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रक वर 09/09/2025 रोजीची तारीख आहे. परंतु पाणी दरवाढ ही 01/09/2025 पासून करण्यात आल्याने जनतेला गृहीत धरून ही दरवाढ केली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जनतेला ही दरवाढ बद्दल कोणतीही हरकत घेता येऊ नये असे एकंदरीत दिसते.
या दरवाढीतून एमआयडीसीला करोडो रुपये उत्पन्न अधिक मिळणार आहेत. गेल्या वर्षी एमआयडीसीला मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्याची कारणे भ्रष्टाचार, भूखंड खरेदी विक्री वाटप मध्ये अनियमिता इत्यादी होता. परंतु हा तोटा भरून काढण्यासाठी पाणी, भूखंड, सेवा इत्यादी दरात वाढ करण्याशिवाय एमआयडीसी कडे पर्याय नव्हता. त्यामुळेच ही पाण्याची दरवाढ केली गेली आहे. भूखंड दर व इतर सेवेत पण यापुढे दरवाढ नक्की होणार.
एमआयडीसीने पाण्याची ही जाचक दरवाढ मागे घ्यावी नाहीतर येथील सर्व राजकीय पक्ष संघटना, रहिवाशी, सामाजिक, कारखानदार संघटना या प्रखर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा जनतेकडून आजी माजी लोकप्रतिनिधी, संभाव्य इच्छुक नगरसेवक उमेदवार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना विचारला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments