ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिकेत आज २७ गावांतील कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह पालिका अधिकारी, स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २७ गावातील ग्रामपंचायतीमधील ४९९ कर्मचाऱ्यांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय झाला होता. मात्र या कर्मचाऱ्यांची ज्या पदावर नियुक्ती झाली होती त्याच पदावर त्यांना महानगरपालिकेत रुजू करण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. याला शासनाने मंजूरी दिली असून २७ गावातील सर्व कर्मचारी ज्या पदावर रुजू झाले होते त्याच पदावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेतही कार्यरत राहतील असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. तर यातील १८० कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या दरम्यान याबाबतचे पत्र देखील देण्यात येईल,असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

.jpg)


Post a Comment
0 Comments