ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मोहने येथील एन.आर.सी.कारखान्याच्या जागेवर अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग युनिट सुरू करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक भूमिपुत्र, नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रखर विरोध दर्शविला. अदानी समूहाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितल्यानंतर हजारो नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात हरकती दाखल केल्या होत्या. त्यानंतर प्रदूषण मंडळाने या हरकतींवर आज सुनावणी घेतली. विशेष म्हणजे हि सुनावणी एखाद्या सरकारी कार्यालय अथवा सभागृहात होणे अपेक्षित असतांना, अदानी समूहाच्या जागेतच उभारलेल्या शाही मंडपात घेण्यात आल्याने यांवर देखील नागरिकांनी आक्षेप नोंदविला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त, खाजगी बाउन्सर तैनात करण्यात आले होते.
सुनावणीला उपस्थित नागरिकांनी या प्रकल्पामुळे परिसरात होणाऱ्या प्रदूषणाचा, आरोग्य व शेतीवर होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्याम गायकवाड यांनी अदानी समूहाच्या प्रकल्पासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. या सुनावणीला परिसरातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यात मयूर पाटील, जे. सी. कटारिया, महेंद्र गायकवाड, सुनंदा कोट, नितीन निकम, विजय काटकर, गोरख जाधव आदींचा समावेश होता. आयटकचे कॉम्रेड उदय चौधरी, ग्रामस्थ मंडळ मोहोन्याचे अध्यक्ष सुभाष पाटील, अटाळी-आंबिवली गावचे भूमिपुत्र दशरथ पाटील, रमण तरे, वैभव पाटील यांनीही घोषणाबाजी करत जोरदार आक्षेप नोंदविला.
कामगारांसाठी असलेली एनआरसी कंपनी बंद करून याठिकाणी सिमेंट कंपनी उभारण्याचा घाट अदानी कंपनीने घातला असून या विरोधात हजारो हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्र, नागरिक, लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन या सिमेंट प्लांटला विरोध दर्शवला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्मार्ट सिटी मध्ये निवड झाली असून अशा स्मार्ट सिटीमध्ये आणि लोकवस्ती मध्ये असा प्रकल्प राबविणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणे आहे. तसेच याठिकाणी असलेला कामगार वर्ग वर्षानुवर्षे राहत असून त्यांची देणी देणे देखील बाकी असतांना हा प्रकल्प उभारणे म्हणजे त्यांच्या जीवाशी देखिल खेळण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी दिली.
तर प्रदुषण महामंडळ कल्याण विभागाचे अधिकारी जयंत हजारे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता सांगितले की, आज जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने हरकती, आक्षेप ऐकून घेण्यात आल्या असून हा अवहाल पर्यावरण विभागाला पाठवणार असून या प्रकल्पास सद्य स्थितीत कोणतीही परवानगी आमच्या विभागाकडून दिली नसल्याचे सांगितले.
स्थानिक रहिवाशांनी एकमुखीपणे मांडले की, "हा प्रकल्प राबविण्यात आला तर परिसरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होईल आणि गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे हा प्रकल्प रद्द केला जावा अशी उपस्थित नागरिकांनी जोरदार मागणी केली. आगामी काळात अदानी कंपनीच्या अंबुजा सिमेंट फॅक्टरीला नागरिकांचा विरोध पाहता प्रकल्पाला गाशा गुंडाळावा लागणार हेच नागरिकांच्या विरोधातून दिसून आले.
Post a Comment
0 Comments