Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणातील आर.टी.जी. शिवसृष्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार - माजी आमदार नरेंद्र पवार

 

नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पातील

सभासदांची झाली बैठक


                       ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिमेच्या आग्रा रोड परिसरातील गेल्या दोन दशकांपासून रखडलेला आर.टी.जी. शिवसृष्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण 100 टक्के प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. या प्रकल्पातील सभासदांच्या झालेल्या बैठकीत  नरेंद्र पवार यांनी ही ग्वाही दिली.

कल्याण पश्चिमेच्या आग्रा रोड स्थित असलेल्या आर.टी.जी. शिवसृष्टी इमारतीच्या पुनर्विकासासाठी मूळ जागामालक देशमुख परिवारातील हावेश देशमुख यांनी साई बाबा डेव्हलपर्स यांना विकसित करण्यासाठी दिली होती. साई बाबा डेव्हलपर्स यांच्याकडून मग मुंबईच्या वांद्रे येथील आर.टी.जी. इन्फ्रा या विकासक कंपनीला हे काम दिले होते. मात्र साई बाबा डेव्हलपर्स आणि आर.टी.जी. इन्फ्रा या दोघांमधील अंतर्गत वादामुळे गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला असल्याची माहिती या सभासदांनी बैठकीदरम्यान नरेंद्र पवार यांना दिली. या दोन्ही विकासकांमधील वादाचा फटका 52 ते 53 रहिवाशांना बसला असून त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित सभासद अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.



या सर्व रहिवाशांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हा प्रकल्प आपण नक्की मार्गी लावू शकतो ही खात्री असल्यानेच आपण हे काम हाती घेतल्याचे सांगितले. तसेच या सर्व प्रकरणाचा आपण अभ्यास करण्यासाठी आपल्याला आणखी 3 आठवड्यांचा कालावधी आवश्यक असून त्यानंतर आपण पुन्हा एका बैठक घेऊ असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला संबंधित इमारतीमधील 30 सभासद प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान यापूर्वी कल्याणच्या चिकणघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटी आणि एलआयजी 1 इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाप्रश्नीही माजी आमदार नरेंद्र पवार हे शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच हा कित्येक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आर. टी. जी. शिवसृष्टी हा प्रकल्पही मार्गी लावण्यासाठी इथल्या सर्व सभासदांनी नरेंद्र पवार यांना आग्रहाची विनंती केली आहे.


Post a Comment

0 Comments