केडीएमसी क्षेत्रांत 11 हजार 589 गणेश मूर्तींचे विसर्जन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भर पावसातही अत्यंत भक्तीमय वातावरणात कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन महापालिका अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच सेवाभावी, सामाजिक संस्था, स्वयंसेवक यांच्या मदतीने विविध विसर्जन स्थळावर संपन्न झाले. हजारो श्री गणेश भक्तांनी आपल्या परंपरेची जपणूक करत , दाटलेल्या मनाने आणि साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल निरोप दिला.
पीओपीच्या 8340 श्री गणेश मूर्तींचे आणि शाडू मातीच्या 3249 अशा एकूण 11589 श्री गणेश मूर्तींचे विसर्जन आज सकाळपर्यंत करण्यात आले. विसर्जन करते वेळी श्री गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार सर्व विसर्जन स्थळांवर अधिकारी वर्गाची नेमणूक करण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व इतर अधिकाऱ्यांसमवेत कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाट या प्रमुख विसर्जन स्थळी रात्रीच्या वेळी स्वतः उपस्थित राहून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.
भाद्रपद महिन्यात संपन्न झालेल्या या श्री गणेशोत्सवासाठी तसेच श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेने वैद्यकीय पथक,फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश इ. सुविधा सज्ज ठेवल्या होत्या, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आवाहनानुसार बहुसंख्य नागरिकांनी यावर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिले आणि हा गणेशोत्सव शांततामय मार्गाने पार पडण्यास सहकार्य केले त्याबद्दल आयुक्तांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.
विसर्जन स्थळी जमा झालेले सुमारे ६६ टन निर्माल्य , खत प्रकल्प गणेश मंदिर डोंबिवली एमआयडीसी व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा खत प्रकल्प तसेच क.डो. म.पा.बायोगॅस प्रकल्प व खत प्रकल्प येथे पाठविण्यात आले. अशाप्रकारे निर्माल्य खाडी, नदी यामध्ये न टाकल्यामुळे जलस्त्रोतातील प्रदूषणात घट होण्यास मदत झाली आहे.
.jpg)





Post a Comment
0 Comments