भव्य एसी डोममध्ये थिरकले डोंबिवलीकर
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांचे आयोजन असलेल्या 'नमो रमो नवरात्री' या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गरबा उत्सवात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रविंद्र चव्हाण हे सहकुटुंब सहभागी झाले. यावेळी देवीच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक होत चव्हाण यांनी आई अंबामातेची मनोभावे आरती केली आणि सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना केली.
डोंबिवली पूर्वेतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात जवळपास ६५ हजार चौ. फूट आकाराच्या भव्य एसी डोममध्ये, भक्तिमय वातावरण आणि देवीभक्तांची ऊर्जा व अंबेमातेची शक्ती याचा अपूर्व संगम अनुभवण्याचा नेत्रदीपक सोहळा असून गरब्याचा ताल आणि भारलेल्या स्वर संगीताचा उत्सव म्हणजे 'नमो रमो नवरात्री' असून या उत्सवाचे यंदा नववे वर्ष आहे. गरबा किंग निलेश गढवी, गरबा क्वीन अल्पा पटेल तसेच माधवी श्रीवास्तव, राहुल पुरेचा, अंशिका, ध्रुव टेलर, डॉ. प्रतिष्ठा वाघेला, अनेरी काकडिया, कुलदीप गढवी यांच्या गरबा गीतांचे भक्तिपूर्ण आणि ऊर्जात्मक सादरीकरण हे या वर्षीचे खास आकर्षण आहे.


'नमो रमो नवरात्री' या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गरबा उत्सवाचा पहिला दिवस भावभक्ती आणि जल्लोषपूर्ण उत्साहात साजरा झाला. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकरांच्या सोबत नवरात्रोत्सवात सहकुटुंब सहभागी होत गरब्याचा आनंद घेतला. गरबा किंग निलेश गढवी आणि गरबा क्वीन अल्पा पटेल यांच्या स्वरातील गरबा गीतांच्या सुरांनी पहिल्या दिवसाला स्वरसाज चढवला. यावेळी 'रामायण' मालिकेतील प्रभू श्रीराम यांच्या मुख्य भूमिकेतून नावारुपास आलेले सुप्रसिद्ध अभिनेते गुरमीत चौधरी देखील उपस्थित होते. 




दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या दिवसापासूनच आपल्या नवरात्री उत्सवाला डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक वेषात गरबा गीतांच्या तालावर रममाण झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटले असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments