ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एक महान संत तथा संत निरंकारी मिशनच्या उप प्रधान श्रीमती राज वासदेवजी यांनी 12 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा आपल्या नश्वर देहाचा त्याग केला आणि त्या निराकार ईश्वरामध्ये विलीन झाल्या.
संत निरंकारी मिशनच्या अनेक प्रेरणादायक पुस्तकांच्या त्या लेखिका होत्या. मिशनच्या आजवरच्या सहाही सद्गुरुंच्या सान्निध्यात भक्ती करण्याचा अमूल्य योग त्यांना प्राप्त झाला. त्यांचे वय 84 वर्षांचे होते. त्यांचे जीवन निरंकारी मिशनच्या इतिहासामध्ये एक उज्ज्वल अध्याय बनून राहिले असून येणाऱ्या पिढ्यांसाठी ते प्रेरणास्रोत बनून राहील
राज वासदेव यांचा जन्म पेशावर येथे 5 मे, 1941 रोजी झला. गुरु परिवाराशी संबंधित असल्याने बालपणापासूनच त्या एक समर्पित भक्त बनल्या. त्यांचे माहेरचे नाव राजिन्दर कौर असे होते. वासदेव सिंह यांच्या सोबत विवाह झाल्यानंतर त्या आध्यात्मिक लेखन व विविध सेवांच्या क्षेत्रामध्ये पुढे आल्या आणि त्यानंतर त्यांना ‘राज वासदेव’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
त्या इंग्रजी विषयातील एम.ए. होत्या आणि त्यानंतर त्यांनी देव कॉलेज, होशियारपुर येथे इंग्रजी प्राध्यापक म्हणून काम केले. 1990 पासून त्यांनी मिशनच्या मासिक पत्रिकांमध्ये एक लेखक म्हणून नियमितपणे योगदान देण्यास सुरवात केली. सतगुरु बाबा हरदेवसिंहजी यांनी सन 2002 मध्ये त्यांना संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितिमध्ये अतिरिक्त मेंबर इंचार्ज म्हणून नियुक्त केले. या कार्यकारिणीच्या त्या प्रथम महिला सदस्या होत्या. सन 2005 ते 2009 पर्यंत त्यांना प्रकाशन विभाग आणि मिशनच्या पब्लिक स्कूलच्या सेवा देण्यात आल्या ज्या त्यांनी अत्यंत निष्ठेने व कुशलतेने निभावल्या.
सन 2013 मध्ये त्यांना प्रचार विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वामध्ये मिशनचा पहिला महिला संत समागम पूज्य निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाला. हे आयोजन महिलांसाठी एक नवी प्रेरणा ठरले. 2015 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला इंग्रजी माध्यम संत समागम आयोजित करण्यात आला.
सन 2018 मध्ये त्यांना ब्रांच प्रशासन विभागामध्ये सेवेची जबाबदारी देण्यात आली ज्यामध्ये हरियाणा, राजस्थान व गुजरात या राज्यांचा समावेश होता. 2019 साली त्यामध्ये मध्यप्रदेश व छत्तीसगढ़ याही राज्यांचा समावेश करण्यात आला. शेवटी 2022 साली सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी त्यांना संत निरंकारी मंडळाच्या उप प्रधान म्हणून नियुक्त केले. ही सेवा त्यांनी आपल्या अंतिम श्वासांपर्यंत निभावली.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने निरंकारी राजपिता रमितजी यांच्या अध्यक्षतेखाली राज वासदेवजी यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी रविवार, दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 5.30 या वेळात ‘प्रेरणा दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये मिशनचे संतजन त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याबरोबरच त्यांच्या प्रति श्रद्धा सुमने अर्पण करतील.
Post a Comment
0 Comments