ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन तसेच हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गुरुवारी सकाळी महापालिकेच्या "ड" प्रभागात सहा. आयुक्त उमेश यमगर आणि त्यांच्या पथकाने तीन वेगवेगळे उपक्रम राबवत तिरंग्यास अनोखे अभिवादन केले आहे. या उपक्रमात आमदार सुलभा गायकवाड, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उप आयुक्त संजय जाधव यांच्या सह अनेक मान्यवर, नागरिक तसेच असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमाच्या अनुषंगाने "ड" प्रभाग क्षेत्र परिसरातील स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान तसेच वेस्टर्न रिजन स्कुल परिसर येथे आमदार सुलभा गायकवाड, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उप आयुक्त संजय जाधव यांच्या उपस्थितीत विविध देशी प्रजातींच्या सुमारे 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली. तद्नंतर शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जिरेटोप चौक, चिंचपाडा रस्ता, काटेमानिवली चौकापासून "ड" प्रभाग कार्यालया पर्यंत "हर घर तिरंगा" प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत शालेय विद्यार्थ्यांनी 100 फुटी ध्वजा समवेत सहभाग घेतला. यावेळी मॉडेल कॉलेज, साकेत कॉलेज, कमलादेवी कॉलेज तसेच सहयोग सामाजिक संस्था, जाणिव सामाजिक संस्था यांचे सह इतर अनेक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हर घर तिरंगाच्या अनुषंगाने "ड" प्रभाग कार्यालयाने द्वारका विद्यामंदिरामधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने युनेस्कोच्या यादीत अंतर्भाव झालेल्या शिवारायांच्या 12 किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारली. या प्रतिकृतींची देखील उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. त्याचप्रमाणे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत "ड" प्रभाग क्षेत्र परिसरात "हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता" हे अनोखे जनजागृतीपर अभियानही राबविण्यात आले. यामध्ये सुमित एल्कोप्लास्टच्या टिमने अतिशय परिणामकारकरित्या स्वच्छतेसोबतच ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व आपल्या पथनाट्याच्या माध्यमातुन उपस्थितांना पटवून दिली.
आमदार सुलभा गायकवाड यांनी या पथनाट्याचे कौतुक करत नागरिकांनी देखील कचरा वर्गीकरण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनी केवळ उदयाच्या स्वातंत्र्य दिनासाठी नव्हे तर यापुढेही नेहमीच आपल्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवावी असे आवाहन करीत आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांना तसेच सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments