Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कथा -आनंद जीवनाचा

                      ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख 

आनंद आणि प्राजक्ताचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे झाले.प्राजक्ताचे सासर आणि माहेर एकाच गावात होते.प्राजक्ता दिसायला सुंदर आणि नोकरी करणारी होती.तिला तिच्या आईवडिलांनी शिकवून तिला तिच्या पायावर उभे केले होते.आनंदही दिसायला देखणा होता.एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर होता.त्यामुळे जेव्हा प्राजक्ताला आनंदचे स्थळ सांगून आले तेव्हा तिच्या बाबांनी लगेच पसंती दर्शवली होती.प्राजक्तालाही आनंद मनोमन खूप आवडला होता.आनंद आणि प्राजक्ताच्या लग्नानंतर त्यांची वरात निघून गेली.आता संध्याकाळ झाली होती.वधूपक्षाकडील मंडळींना एका तासात हाॅल रिकामा करून द्यायचा होता.त्यामुळे मुलीकडच्या पाहुण्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन सामानाची आवराआवर करायला सुरुवात केली.त्यानंतर वधूकडील मंडळी एकेक करून जायला निघाली.त्यावेळी प्राजक्ताच्या आईने अगदी जवळच्या असणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन त्यांची रवानगी केली.आता लग्नाचा हॉल पूर्णपणे रिकामा झाला होता.

आतापर्यंत लग्नाच्या कामात व्यस्त असल्यामुळे प्राजक्ताच्या आईवडिलांना एकटेपणा जाणवला नाही.परंतु आता सगळे पाहुणे मंडळी निघून गेल्यावर त्यांना एकटं वाटू लागलं.प्राजक्ताचे वडील तिच्या आठवणीने सारखे रडत होते.तिच्या आईने मात्र डोळ्यांत एक टिपूसही आणला नाही.कारण तिला माहित होतं की ती जर रडायला लागली तर प्राजक्ताच्या बाबांना सांभाळणं कठीण जाईल.

  सर्व लोक निघून गेले होते.आता फक्त प्राजक्ताच्या वडिलांचे अगदी जवळचे मित्र त्यांच्यासोबत होते.त्यांची गाडी रात्री दहा वाजता असल्याने ते दांपत्य प्राजक्ताच्या वडिलांच्या घरी काही वेळासाठी त्यांच्यासोबत कारने आले.घरी आल्यावर थोडावेळ सर्वांनी आराम केला.आराम झाल्यावर प्राजक्ताच्या आईने थोडं नाश्त्याचं त्यांच्या प्रवासाकरीता बांधून दिलं.सर्वांनी चहा घेतला.आता गाडीला फक्त एक तास उरला होता.प्राजक्ताचे वडील त्यांच्या मित्राला सपत्नीक रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले.त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडून आणि मित्राचा निरोप घेऊन घरी आले.घरी पोहचताच त्यांच्या मोबाईलवर प्राजक्ताच्या सास-यांचा व्हिडिओ काॅल आला.प्राजक्ताच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले.तिकडून प्राजक्ताचे सासरे बोलत होते -"नमस्कार.काही नाही हो.आम्ही घरी पोहचलो.एक गोष्ट तुम्हाला सांगायला व्हिडिओ काॅल केलाय.तुमची मुलगी खूप समजूतदार आहे.बघा ना, दोन दिवसानंतर खरं तर नवीन जोडप्याला हनीमूनला जायचं आहे.पण तुमची मुलगी म्हणते की फिरायला खूप आयुष्य पडलं आहे.पहिले मला माझ्या सासरच्या लोकांना समजून घ्यायचं आहे.तिला आमच्यासोबत वेळ घालवायचा आहे.छान-छान पदार्थ बनवून आम्हाला खाऊ घालायचे आहेत.आता तर आनंदने सुध्दा तिच्या होत हो केलं आहे.खरंच इतकी चांगली सून मिळायला आम्ही नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार." प्राजक्ताच्या सास-यांनी तिचे केलेले कौतुक ऐकून तिच्या आईवडिलांच्या चेह-यावर एक तेज पसरले.त्यांची मुलगी इतकी समजूतदारपणे वागते आहे याचे त्यांना खूप कौतुक वाटले आणि आनंदही झाला.प्राजक्ताचे सासरे पुढे म्हणाले,"हे बघा, आम्ही प्राजक्ताचे म्हणणे तेव्हाच मान्य करू जेव्हा तुम्ही दोघे काही दिवसांसाठी आमच्याकडे रहायला याल."आता प्राजक्ताच्या आईवडिलांना यावर काय बोलावे काहीच सुचत नव्हते.इतक्यात व्हिडिओ काॅलवर आनंद स्वतः आला आणि तो प्राजक्ताच्या बाबांना म्हणाला,"आई-बाबा, तुम्ही कसला विचार करताय? अहो हे तुमच्या मुलीचे सासर आहे.म्हणजेच तुमचेही घर नाही का? मला माहित आहे की आताच आमचे लग्न झाले आणि लगेच कसं काय मुलीच्या सासरी रहायला जायचं असा विचार मनात येतो आहे.असा विचार अजिबात करू नका.तुम्ही जसे प्राजक्ताचे आईबाबा आहात तसे आता माझे सुध्दा आहातच की."

प्राजक्ताच्या सासरच्या मंडळींकडून इतकं प्रेमाने आमंत्रण मिळाल्याने तिच्या आईबाबांनी आनंदला त्यांच्याकडे काही दिवसांसाठी येण्याची हमी भरली.आनंद प्राजक्ताच्या आईवडिलांना म्हणाला," तुम्ही दोघेही उद्या तयार रहा.मी येतो तुम्हाला घ्यायला." असे म्हणत आनंदने व्हिडिओ काॅल बंद केला.

        प्राजक्ताच्या आईबाबांच्या चेह-यावर आनंदाश्रू ओघळू लागले.त्यांनी कधी विचारही केला नव्हता की त्यांच्या मुलीला एव्हढं चांगलं सासर मिळेल.आनंदचेही त्यांना खूप कौतुक वाटत होते.त्यांना आता भरून पावल्यासारखे वाटू लागले.प्राजक्ताने जेव्हा आनंदचा तिच्या आईबाबांसोबत झालेला संवाद ऐकला तेव्हा तिच्या डोळ्यांत सुखाश्रू तरळले.इतकं छान सासर मिळाल्याने ती स्वतःला जगातील सर्वात भाग्यशाली महिला समजत होती.


         

Post a Comment

0 Comments