शासनाच्या निर्देशानुसार "हर घर तिरंगा" अर्थातच "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम यावर्षी 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. नागरिकांचे राष्ट्रध्वजाशी वैयक्तिक नाते दृढ व्हावे तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य देश प्रेम निर्माण व्हावे या हेतूतून या अभियानातंर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे.
या अभियानाच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये दि. 2 ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शालेय विदयार्थ्यांना आपला तिरंगा ध्वज कसा तयार झाला याची माहिती देण्यासाठी काल महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये तिरंगा चित्राचे मनोहारी प्रदर्शन साकारण्यात आले होते. याच उपक्रमांतर्गत महापालिकेच्या विदयुत विभागाने देखील शहरातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच चौक, महत्त्वाच्या इमारती, महापालिका इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ओक टॉवर अशा ठिकाणी आकर्षक तिरंगा रोषणाई केल्यामुळे रात्रीच्या वेळी या इमारती नयनरम्य रंगाने नाहुन गेलेल्या दृष्टीपथास येत आहे.
त्याचप्रमाणे "हर घर तिरंगा" उपक्रमातंर्गत महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत रविवार दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता महापालिका मुख्यालयापासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी महापालिकेच्या या सायकल रॅलीमधे तसेच "हर घर तिरंगा" या उपक्रमातंर्गत दि.15 ऑगस्ट पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments