भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दहीहंडी उत्सवाला सर्वाधिक गर्दी
ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली येथील बाजीप्रभू चौकात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वेळी त्यांनी हिंदू संस्कृती जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. युवक हा बदलाचा प्रमुख आधार असून, महाराष्ट्राचे शिल्पकार होण्यासाठी त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असा संदेश चव्हाण यांनी दिला.दोनशे प्लस गोविंदा पथकांनी भारत माता की जयचा नारा देत दिवसभरात सलामी देणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळपासूनच या उत्सवाला युवकांची तुडूंब गर्दी असल्याचे पहायला मिळाले.जय हो नंदलाल की, जय यशोदा लाल की। गोकुल में आनंद भयो, जय कन्हैय्या लाल की असे म्हणत चव्हाण यांनी शनिवारी सकाळी उत्सवाचा शुभारंभ केला.
उत्सव-उत्साह, परंपरा आणि संस्कृती याचं प्रतीक म्हणजे गोपाळकाला हा सण! श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा हा सण केवळ एक धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे ते म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. हिंदू संस्कृतीचा सन्मान आणि देशभक्तीचा संगम साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहात करण्यात येते. यामुळेच हा दहीहंडी उत्सव डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग बनला आहे. यामुळेच या दहीहंडी उत्सवाला नवी ओळख मिळाली आणि 'डोंबिवलीचा मानबिंदू' म्हणून ती उदयास आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्राची प्रगतिपथावरील वाटचाल अधोरेखित करण्यासाठी 'आम्ही होऊ शिल्पकार महाराष्ट्राचे' ही यंदाच्या दहीहंडी उत्सवाची थीम ठेवण्यात आली आहे.
दहीहंडी सणाचे औचित्य साधून बाजीप्रभु चौक येथे हंडीची पूजा करून हंडी बांधली. तसेच सर्व गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. आनंद, एकात्मता आणि उत्साह यांचा संगम जसा दरवर्षी अनुभवायला मिळतो तसा तो आजही अनुभवला..हाच आनंद,उत्साह द्विगुणित होत राहो हीच नंदलाला चरणी प्रार्थना केल्याचे चव्हाण म्हणाले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, डोंबिवली ग्रामीण मंडल महिला अध्यक्ष मनिषाताई राणे, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडल महिला अध्यक्ष प्रिया जोशी, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष पवन पाटील आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments