राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वर मिलिंद एकबोटेंनी टीका केल्याने कल्याणात निदर्शने
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर मिलिंद एकबोटे यांनी टीका केल्याच्या निषेधार्थ कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि पूर्वेतील काटेमानिवली नाक्यावर निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.
हिंदुत्त्ववादी आणि महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील एका सभेत देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करीत जर्सी गायींचे दूध आरोग्यास योग्य नाही. याच गायींच्या दुधामुळे नपुंसकता आली असल्याचा खळबळजनक दावा केला होता. हा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडून काढून “मला कुरेशी लोकांवर अन्याय झाल्याचे चालणार नाही” असे वक्तव्य केल्याने मिलिंद एकबोटे यांनी अजित पवार यांना जनाची नाही तर मनाची बाळगायला हवी होती, अशी टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्ते मध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कल्याणातील राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे यांच्या मार्ग दर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी कल्याण पूर्वेतील काटेमानवली नाका व कल्याण पश्चिमे कडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात निषेध करीत निदर्शने केली. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काटेमानिवली नाका कल्याण पूर्व या ठिकाणी मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मनोज नायर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कडू, जिल्हा सचिव देवबा सूर्यवंशी, प्रदेश प्रतिनिधी वर्षा कळके, भावेश सोनवणे तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्त्या विद्यार्थी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते
तर कल्याण पश्चिमेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड, रामचंद्र यावलकर, विनोद भोईर, रश्मी कोलते, दर्शन देशमुख, रेखा सोनवणे, गोरख शिंदे, भगवान साठे, संध्या साठे व इतर कार्यकर्त्यांनी मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात घोषणा बाजी करीत त्याचा फोटोवर फुल्ली मारीत जोरदार निदर्शने केली.
Post a Comment
0 Comments