Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणातील कॅप्टन ओक हायस्कूलमधील नाविन्यपूर्ण स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न.

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल कल्याणमधील कलाशिक्षक श्री. कैलास यादव सरोदे, हे दि.२८फेब्रुवारी २०२५रोजी सेवानिवृत्त झाले; त्यांनी आपल्या सेवाकाळात उपक्रमशील कलाशिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला तसेच त्यांनी विद्यार्थी व पालक प्रिय शिक्षक म्हणूनही  आपली ओळख  निर्माण केली होती. त्यांनी आपल्या सेवापूर्ती वर्षानिमित्तही अनेक उपक्रम आपल्या संकल्पनेतून व सौजन्याने राबविले. जसे... 'संवाद कृषिपुत्राशी', शैक्षणिक सहल वर आधारित 'वृत्तांत लेखन स्पर्धा' भित्तीचित्र- चित्रकला स्पर्धा , 'टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे स्पर्धा', 'मुक्त चित्रकलाविष्कार' चित्रकला स्पर्धा व 'सुंदर फलक लेखन' स्पर्धा घेण्यात आल्या तसेच संस्थेच्या सर्व शाळातील शिक्षकांसाठीही सुंदर फलक लेखन स्पर्धा घेतली होती.

     दि.३०जुलै २०२५रोजी 'संवाद कृषीपुत्राशी'  व 'मॉन्टेरिया व्हिलेज' या शैक्षणिक सहलीवर  आधारित वृत्तांत लेखन स्पर्धेचा, 'भित्तीचित्र'  चित्रकला स्पर्धेचा व 'टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणे' या  स्पर्धांचा  बक्षीस समारंभ  घेण्यात आला. या बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून बालक मंदिर संस्थेचे सहकार्यवाह  

श्री. प्रसाद ग. मराठे सर लाभले  होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून कल्याणच्या  श्री. गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांचन शशांक भालेराव ह्या लाभल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. प्रसाद मराठे सरांना, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती कांचन भालेराव मॅडम यांना शाळेतर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले व शाळेचे मुख्याध्यापक म्हणून श्री.दिलीप  तडवी सरांनाही सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

         घेण्यात आलेल्या चारही स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना पहिल्या तीन क्रमांकाचे व उत्तेजनार्थ बक्षीसं म्हणून  सन्मानचिनह व प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी  'भित्तीचित्र' चित्रकला स्पर्धेसाठी व 'टाकातून टिकाऊ वस्तू बनविणे' स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून   विशेष सहकार्य केल्याबद्दल शाळेतील कलाशिक्षक श्री. पांडुरंग भारती सर व श्री. देवेंद्र कापसे सर यांना  तर मॉन्टेरिया व्हिलेज या शैक्षणिक सर आधारित वृतांत लेखन स्पर्धेचे परीक्षक म्हणून विशेष सहकार्य केले म्हणून सौ. मनीषा जाधव मॅडम व  सौ.रंजना बावस्कर मॅडम यांना तसेच 'संवाद कृषिपुत्राशी' या कार्यक्रमावर आधारित वृत्तांत लेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विशेष सहकार्य केलेले श्री. रमाकांत सोनवणे सर  यांना शाळेतर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले व 'मॉन्टेरिया व्हिलेज' या शैक्षणिक सहलीवर आधारित उत्स्फूर्त लेखन केल्याबद्दल सौ. रूपाली कोंडेजकर मॅडम यांनाही सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक  श्री. दिलीप तडवी सर  व ज्येष्ठ शिक्षक श्री. उत्तम गायकवाड सर, श्री. बाळकृष्ण शिंदे सर  यांचे मला  नेहमीच स्पर्धा व उपक्रमांसाठी  प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले आहे . सौ. अमिता पाठक यांचेही  नेहमीच उपक्रम व  स्पर्धांना  प्रेरणा व सहकार्य  मिळाले  आहे ; म्हणून सौ. अमिता  पाठक मॅडम यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.तसेच माझ्या स्पर्धा व उपक्रमांना इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही नेहमीच सहकार्य लाभले आहे. यावेळी  श्री. मिलिंद खळदकर सर यांना नुकत्याच ५१ व्या महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर टू (५९ किलो) वजनी गटात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल शाळेतर्फे सन्मानचिन्ह  देऊन सन्मानित करण्यात आले. 

      शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप तडवी सर यांनी श्री. कैलास सरोदे सर यांनी आतापर्यंत शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत . सेवानिवृत्तीनंतरही ते शाळेत येऊन विद्यार्थ्यांना रिक्त तासिकांना उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञान देण्याचा काम करीत आहेत ,असे आपल्या प्रास्ताविकातून कौतुक केले. श्री कैलास सरोदे सर यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, मी थंडी, ऊन ,वारा व पावसात शालेय जीवनात लोकांच्या शेताच्या बांधावर काम केलेला एका शेतमजुराचा  मी मुलगा आहे. शालेय जीवनामध्ये माझी  खूप परवड झाली. लहानपणी  मी माझ्या आई वडिलांची व मोठ्या भावांची जगण्यासाठीची झालेली वाताहत मी खूप जवळून बघितली. मी शाळेत काम करीत असताना माझ्या लहानपणी जे काही भोगलं ,त्या घटना व प्रसंग समोर ठेवून शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी व संस्थेसाठी काम करत आलोय. आजच्या कार्यक्रमांचा मला खूप आनंद आहे आणि तेवढं  दुःखही आहे.  शाळा सोडताना मला खूप वाईट वाटतंय, सेवानिवृत्तीपूर्वी शाळेत मी अधिकृतपणे येत होतो, आणि आताच्या  येण्यामध्ये  मला खूप फरक जाणवतो, ही वेदना त्यांनी बोलून दाखविली. शाळेने व संस्थेने  मला खूप काही दिलंय ,मी शाळा व संस्थेचे ऋण कधी विसरू शकत नाही, त्यामुळे मी शाळेला आई मानलंय हे हे सगळं सांगत असताना श्री.कैलास  सरोदे सर अतिशय भावनिक झाले होते. संस्था,  शाळा, विद्यार्थी व पालकांचे भरभरून प्रेम मला मिळाले ,असे आवर्जून सांगितले.तसेच श्री. सरोदे सरांनी स्पर्धा व उपक्रमांचा हेतूही स्पष्ट करून सांगितला. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या 'संवाद कृषिपुत्राशी' या  विद्यार्थ्यांसाठीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांच्या जळगांव जिल्ह्यातील लोहारा गावचे कृषिभूषण ,कृषिरत्न शेतकरी श्री. विश्वास आनंदराव पाटील व जळगांवचे शिवव्याख्याते श्री. जयवर्धन नेवे  यांचा 'छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवक' या विषयावर  विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले व्याख्यान, हे दोन कार्यक्रम नेहमीच लक्षात राहतील असे झाले होते. असे अभिमानाने सांगितले.

          कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या  श्रीमती कांचन भालेराव यांनी श्री. सरोदे सरांविषयी  बोलताना सांगितले की,आजचा आनंदाचा प्रसंग जास्त महत्त्वाचा आहे कारण सरोदे सरांनी विशेषत्वाने वर्षभरात ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या आहेत, त्या सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ आज येथे आहे. सगळच आगळं वेगळं आहे. सरांनी अशा स्पर्धा आयोजित करणं त्यातनं विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभ ठेवणं आणि सेवानिवृत्ती झाल्यावरहीसुध्दा सर येथे  सातत्याने शाळेशी संपर्कात आहेत, शाळेत येऊन तुम्हा विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत. यासारखी इतक्या आनंदाची गोष्ट शाळेसाठी आणि संस्थेसाठी दुसरी नाही! खरोखरच इतके वर्ष मी या क्षेत्रात आहे पण असं  व्यक्तिमत्व की ,जे सेवानिवृत्त झाल्यावरसुध्दा शाळेत यावसं  वाटतं , शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काम करावसं वाटतं, असं वाटणारी व्यक्ती आज मला बघायला मिळते आहे, ही आनंदाची ,कौतुकाची, शाळेसाठी व संस्थेसाठी  अभिमानाची गोष्ट आहे. असे भरभरून कौतुक केले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना बोध मिळेल अशी गोष्टही सांगितली. 

      कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रसाद मराठे सर यांनी  सरोदे सरांविषयी बोलताना सांगितले की, सरोदे सरांची तळमळ खरोखरच सर्वांनाच जाणवते. तुम्हालाही ही तळमळ जाणवलेली असेल. सरोदे सरांनी एक वाक्य असं वापरलं की, मी शाळेत अधिकृतपणे पूर्वी येत होतो त्यामध्ये आणि आता येण्यामध्ये मला खूप फरक जाणवतो, त्यावर मराठे सर म्हणाले की, पण मला असं वाटतं की, आपला मुख्य केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे, त्यामुळे तुम्हाला जरी तसं वाटत असलं तरी आम्हाला तसं  अजिबात वाटत नाही, जे पूर्वीचे सरोदे  सर आहेत तेच आताचे सुद्धा आहेत. असंच आम्हाला सुद्धा सगळ्यांना वाटतंय. श्री प्रसाद मराठे  सर यांनी सरोदे सरांच्या स्पर्धा व उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.सरोदे सरांनी त्यांना सहकार्य करणाऱ्या काही शिक्षकांची नांवे  घेतली, त्यावर ते श्री.मराठे सर असं म्हणाले की, अजूनही त्याव्यतिरिक्त आपल्या शाळेतील अनेक शिक्षक असे आहेत की,ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करीत असतात. आणि त्याचा परिपाक, त्याचा सार म्हणजे आजचा बक्षीस समारंभ! यावेळी मराठे सरांनी अभिमानाने सांगितले की, मीही याच शाळेचा विद्यार्थी होतो, यावेळी त्यांनी त्यांच्या  वेळच्या शाळेतील आठवणी सांगितल्या.तसेच तसे गुरु शिष्य परंपरेची गोष्टही  सांगितली.

            यावेळी विविध स्पर्धातून बक्षीसपात्र  विद्यार्थी बक्षीस घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विशेष बघण्यासारखा होता.  पालकही श्री. सरोदे सरांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रम व  स्पर्धा बद्दल खूप समाधान व्यक्त  करत  होते.या बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे ऐकतच राहावे असे श्रवणीय  सूत्रसंचालन शाळेतील  सौ.अमिता पाठक यांनी केले आणि उपस्थितांचे आभारही त्यांनी आपल्या गोड अशा मधुर वाणीने  मानले.

      

Post a Comment

0 Comments