स्त्रीच्या मनात काय चाललंय हे उलगडणं सोपं नाही असं म्हणतात.तिचा प्रवास एखाद्या फुलपाखरासारखा असतो.आधी अंड,मग सुरवंट,त्यावर चढणारा कोष आणि शेवटी फुलपाखरू.खरंतर स्त्री निसर्गतःच मृदू, कोमल असते.तिचे फुलपाखरात रूपांतर झाले की ती अधिकच देखणी दिसते.ती कोषातून बाहेर पडून नव्या जगात प्रवेश करते.तिच्या अस्तित्वाची जाणीव ती जगाला करून देते.पण ती एक स्त्री असल्याची जाणीव तिला लहानपणापासूनच करून दिली जाते.तिच्यावर संस्कारांचं, समाजाचं,संकृतीचं इतकं ओझं लादलं जातं की ती स्वतःची ओळख विसरून जाते.एक प्रकारे तिला जायबंद केलं जातं.तिलाही वाटतं तिनेही गगनभरारी घ्यावी.आपल्यातही सामर्थ्य आहे हे तिला सिध्द करायचं असतं.पण प्रत्येकच मुलीच्या वाट्याला हे सुख येत नाही.अनेक मुलींची स्वप्ने फक्त स्वप्नेच राहतात.दुस-यांच्या सुखासाठी,कधी जवाबदारी पार पाडण्यासाठी,कधी वाईट परिस्थितीमुळे त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होते.कित्येक मुलींना स्वच्छंदपणे बागडताही येत नाही.सुंदर आयुष्य जगणे तर सोडाच तिला तिच्या अस्तित्वाचा,सुंदरतेचाही विसर पडतो.एका अनामिक चक्रव्यूहात ती गुरफटली जाते.तिच्यातील फुलपाखराला तिच्या सुंदर, चमकदार रंगाचाही विसर पडतो.
पण एक गोष्ट लक्षात ठेव! तुझ्यात आजही फुलाफुलांवर उडण्याची धमक आहे.तुझ्या पंखात अजूनही ताकद आहे.तुझ्या पंखांतील बळ एकवटून मनसोक्त हिंड-फिर.तुझ्यावर, तुझ्या मनावर लादलेले ओझे जरा बाजूला सार आणि मोकळा श्वास घे.तुझ्या पंखांना उडण्याची ताकद तूच देऊ शकते.घे उंच भरारी आणि पहा हे सुंदर जग.तूच तुझी सखी हो.तुला पुढे जायलाच हवं.तुझ्यातील सामर्थ्याची, तुझ्या अस्तित्वाची जाणीव सर्वांना करून दे.तुझ्यातील सुप्त गुणांना दाखवून दे,या जगाला.चल ऊठ आता...तू सुंदर फुलपाखरू आहेस!...तुला उडायलाच हवं!
Post a Comment
0 Comments