ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली झोन अंतर्गत कल्याण ब्रांचच्या वतीने रविवारी 10 ऑगस्ट रोजी नूतन विद्यालय, कल्याण पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 158 निरंकारी भक्तगणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 132 पुरुष तर 26 महिलांनी रक्तदान करून मानवतेसाठी आपले योगदान दिले. या शिबिरातील रक्त संकलन संकल्प रक्तपेढी, कल्याण व संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले, मुंबई यांच्या मार्फत करण्यात आले.
सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज देत असणारी मानवीयतेची शिकवण रक्तदानाच्या माध्यमातून आपल्या कर्माद्वारे निरंकारी भक्तगणांनी प्रदर्शित केली. रक्तदान शिबिराची सुरुवात संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली झोन क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांनी निरंकार ईश्वराच्या प्रति प्रार्थना करत सतगुरूंच्या जयघोषाद्वारे केली. यावेळी निरंकारी मिशनचे सेवादल स्वयंसेवक तसेच कल्याणसह आजुबाजूच्या परिसरातील निरंकारी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराला शहरातील अनेक नामांकित मान्यवर उपस्थित राहिले व त्यांनी संत निरंकारी मिशन निरंतर मानवतेप्रती करत असलेल्या कार्याचे कौतुक देखील केले. यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक निलेश शिंदे यांचा समावेश होता. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, सर्व सेवादल स्वयंसेवक व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
Post a Comment
0 Comments