ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पेंढारकर महाविद्यालयातील शासननियुक्त प्रशासकच भ्रष्टाचाराचे केंद्र बनल्याचा आरोप सेव्ह पेंढारकर मोहिमेने केला असून महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. विजय नरखेडे यांच्याविरुद्ध गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी सेव्ह पेंढारकर मोहिमेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत आयकर आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
के. वि. पेंढरकर महाविद्यालयावर शासनाने २९ मे २०२५ रोजी प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या डॉ. विजय नरखेडे (सह-संचालक, उच्च व तंत्र शिक्षण, कोकण विभाग, पनवेल) यांच्याविरोधात आता गंभीर आर्थिक भ्रष्टाचार, पदाचा दुरुपयोग व नैतिक अधःपतनाचे आरोप करण्यात आले आहेत. शासनाकडून प्रशासक नेमले गेलेले असताना, नरखेडे यांनी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क व अन्य आर्थिक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करून गैरप्रकार केले. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कमी केल्याचा खोटा प्रचार करून, प्रत्यक्षात महाविद्यालय व्यवस्थापनासोबत संगनमत करून अधिक शुल्क आकारणी सुरूच ठेवण्यात आली.
नरखेडे यांच्या संपत्तीचा स्तर त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा खूप अधिक असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करून कोटींची मालमत्ता जमा केल्याचा संशय आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि आयकर विभाग यांच्यामार्फत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पेंढरकर महाविद्यालयावर प्रशासक असताना, नरखेडे यांनी संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता न राखता स्वार्थी हस्तक्षेप केला. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गात प्रचंड नाराजी व संशय निर्माण झाला आहे.
त्यामुळे त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ आणि पेंढरकर महाविद्यालयातील सर्व आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे. शासनाच्या आदेशाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याबद्दल शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी सेव्ह पेंढारकर मोहिमेच्या वतीने करण्यात आली आहे.
तर "सेव्ह पेंढारकर" आंदोलनाला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पाठिंबा देत हा विषय विधान भवनात मांडला असून येथील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
Post a Comment
0 Comments