दोन जणांना कारवाईची नोटीस असतांना एकावरच कारवाई
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असते. आता देखील एकाच ठिकाणी असलेल्या दोन जणांना कारवाईची नोटीस देण्यात आली मात्र राजकीय दबावाखाली सहाय्यक आयुक्तांनी केवळ एकावरच कारवाई केली असल्याचा आरोप बाधित जागा मालकाने केल्याने केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क समोरील प्रस्तावित डीपी रस्त्यात जागा मालक अजय सावंत यांची जागा असून याठिकाणी त्यांनी पत्रे लावले होते. रस्त्यात बाधित होणाऱ्या या जागेबाबत सावंत यांना केडीएमसीने नोटीस जारी केली होती. याच जागेच्या समोरील सावंत यांच्या जागेत एकाने अतिक्रमण करत जिम सुरु केली असून याबाबत सावंत यांनी केडीएमसीला तक्रारी केल्या. मात्र तरीदेखील केडीएमसी कारवाई करत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर केडीएमसीने संबंधितांना केवळ नोटीस दिली. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात येईल असे केडीएमसी कडून सांगण्यात आले.
मात्र आज कारवाई करताना केडीएमसीच्या क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी केवळ अजय सावंत यांच्या पत्र्यांवर कारवाई केली.
याबाबत सावंत यांनी सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना विचारले असता आपल्यावर राजकीय दबाव असल्याने आपण त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही असे उत्तर दिल्याचे सावंत यांनी सांगितले. अशा प्रकारे राजकीय दबावापोटी पक्षपातीप्रमाणे कारवाई केडीएमसी करणार असेल तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
तर याबाबत सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना विचारले असता, रस्त्यांची कारवाई हि प्रथम प्रस्तावित होती. यानुसार कारवाई केली असून समोरील जागेत असलेल्या जीमवर देखील कारवाई केली जाणार असून आपल्य्वर राजकीय दबाव असल्याचे आपण बोललो नसल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments