ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला एका परप्रांतीन कडून बेदम मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रविवारी कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट असणाऱ्या एका मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून अमानुष मारण करण्यात आली. डॉक्टर एमआर यांच्याबरोबर बोलत आहे, तुम्ही थोडं थांबा, एवढेच बोलण्यामुळे गोकुळ झा नामक इसमाने त्या रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला लाथा बुक्क्याने अमानुष मारहाण केली. याबाबत मानपाडा पोलिसांत तरुणीने गुन्हा दाखल केला परंतु 24 उलटूनही पोलिसाना आरोपी सापडला नाही, ही बातमी कळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेराव केला. पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली परंतु रात्री दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते योगेश गव्हाणे मलंग रोडवरील नेवाळी दिशेने जात असताना त्यांना आरोपी गोकुळ झा दिसला आणि त्यांनी त्या आरोपी गोकुळ झा याला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले.
आज गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला पोलीसांनी कल्याण न्यायालयात हजर केले असता, सुनावणी वेळी गोकुळ झा याने माझ्यावर कारवाई केली म्हणत, माझ्या भावाला का ताब्यात घेतले असे सांगत त्याने न्यायालयात गोंधळ घातला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. यावेळी न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असता पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती फिर्यादी पिडीत तरुणीचे वकील हरीश नायर यांनी दिली. तसेच गोकुळ झा याच्यावर उल्हासनगर, कोळसेवाडी आणि मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही हरीश नायर यांनी सांगितले.
तर सरकारी वकिलांनी आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र याबाबत सत्य परिस्थिती सांगितल्यावर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये गोकुळ झा हा संशयित आरोपी असून त्या आधारे या गुन्ह्यात त्याला शिक्षा देता येणार नसल्याचे आरोपीचे वकील सुदाम गव्हाणे यांनी सांगितले.
याबाबत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले कि, मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्या संदर्भात अटक असलेल्या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. यामध्ये उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज नुसार तपासणी करणे आवश्यक असून पीडित तरुणी ही रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला झालेल्या जखमांच्या आधारे मेडिकल रिपोर्ट येणे बाकी असून, आणखी तपास करण्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक होती ती न्यायालयाने दिली आहे. उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज, मेडिकल रिपोर्ट आणि साक्षीदारांची साक्ष तपासून पुढील तपास करून आणखी कलमे वाढविण्याची आवश्यकता असल्यास ही कलमे वाढविण्यात येतील अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments