ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बाजार समितीवरील प्रशासकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. या बंदमध्ये बाजार समितीमधील सर्व व्यापारी, माथाडी संघटना सहभागी झाल्याने बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प पडले होते. यावेळी फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पोखरकर, उपाध्यक्ष कमरुद्दीन शेख, सदस्य सदाशिव टाकळकर, गणेश टाकळकर, सुशिल येवले, प्रफुल्ल घोणे, योगेश मोडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊ नरवडे, गिरीष पाटील, इस्माईल बागवान, शफिक बागवान, वसंती देढीया, नरेंद्र परमार, राम वर्मा, विलास पाटील आदी व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किशोर मांडे यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग करीत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील इतर सेवासुविधांसाठी विकास आराखड्यात राखीव असलेला सव्र्व्हे नंबर २८२ व २८४ मधील ५००० चौ. मीटर भूखंड १० वर्षाच्या भाडेतत्वावर लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेला देण्याबाबतचा भाडेपट्टा करार सर्व व्यापारी संघटनांना अंधारात ठेऊन केला. या जागेवर भविष्यात कोणतेही तात्पुरते किंवा कायम स्वरूपी गाळे निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते.
याच्याच निषेधार्थ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी बांधवांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक पूर्ण क्षमतेने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बंद आंदोलनाला शेतकरी, व्यापारी, माथाडी, मापाडी, हमाल आदी घटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यामध्ये फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघ, कल्याण कांदा-बटाटा-लसूण होलसेल व्यापारी असोसिएशन (रजि.), कल्याण फुटस मर्चेट असोसिएशन, कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना कल्याण, ॐ शिवम जन कल्याण वेलफेर एशोसिएशन, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन यासह इतर अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या.
प्रशासकीय कामकाज पहात असताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक किशोर मांडे यांनी व्यापाऱ्यांना भविष्यात अडचणीच्या ठरतील अशा गोष्टी केल्या. कमी कालवधीत काही धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामध्ये 5 हजार चौरस मीटरचा भूखंड एका संस्थेला दिला. यामध्ये कोणतीही टेंडर प्रोसेस न करता नूतनीकरणाच्या नावाखाली मोक्याचा भूखंड बेकायदेशीरपणे दिला आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या व्यापार करणाऱ्यांसाठी सुविधा भूखंड म्हणून असलेली जागा बाधित झाली आहे. याच्याच निषेधार्थ ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संघटीत रित्या बंद पुकारला असल्याची माहिती फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पोखरकर यांनी दिली.
तर हि फक्त रस्त्यावरची लढाई नसून याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी उद्यापासून सुरु होणार असून तिथे आम्हाला प्रभावीपणे न्याय मिळेल अशी व्यापारयांना अपेक्षा असल्याचे गणेश पोखरकर यांनी सांगितले.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दररोज नाशिक, अहिल्यानगर, जुन्नर, पुणे परिसरातून भाजीपाल्याचे सुमारे ४५० ट्रक येतात. फळांचे १५० ट्रक, फुलांचे २०० ट्रक येतात. याशिवाय विविध प्रकारचे धान्य वाहू सुमारे शंभरहून अधिक वाहने येतात. बाजार समितीत बंद असल्याने पुरवठादार व्यापाऱ्यांनी बुधवारी बाजार समितीकडे पाठ फिरवली. कल्याण, डोंबिवली, मुरबाड, कसारा, शहापूर, भिवंडी परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांना या बंदचा सर्वाधिक फटका बसला. बाजार समितीत दररोज सुमारे दीड कोटी रूपयांची उलाढाल होते. तर व्यापार्यांच्या या बंदमुळे घाऊक बाजार बंद असल्याने याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला. यामुळे भाजीपाल्याचे दर किंचित वधारले होते.
Post a Comment
0 Comments