Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिक्षणाचा नवा सूर___कृती, संवाद व संवेदना.


                   ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख    

 2025/26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नव्या धोरणाच्या अनुषंगाने, नव्या उमेदीने झाली आहे. आपणा सर्वांना मार्गदर्शन देणारे( NEP) प्रशिक्षण सत्र देखील सुरू आहेत , किंबहुना वर्षभर सुरूही राहणार आहेत. अलीकडेच निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीचे ट्रेनिंग झाले, त्यातही तितक्याच प्रेरणेने नव्या धोरणासंदर्भात मार्गदर्शन मिळाले. या लेखाच्या माध्यमातून सर्व शिक्षक बंधू भगिनींशी अध्ययन व अध्यापन पद्धतीत झालेल्या बदलासंदर्भात एक संवाद साधण्याची मला संधी मिळाली आहे.

      आपल्याला ज्ञातच आहे ,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे केवळ अभ्यासक्रमातील बदलाचे दस्तऐवज नाही तर शिक्षणाच्या मूळ हेतूचा पुनर्विचार करणारे एक परिवर्तन आहे. म्हणजे आपण केवळ ज्ञानदाते नाही तर भविष्यातील सक्षम, संवेदनशील व जबाबदार नागरिक घडविणारे शिल्पकार आहोत. किंबहुना पूर्वीही होतो यात शंका नाही ,मात्र आज शिक्षण क्षेत्रात जे झपाट्याने बदल होत आहेत त्या अनुषंगाने काही बदल आपणही आत्मसात करायला हवेत.

    आपल्याला माहीतच आहे या धोरणा नुसार विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृतीवर आधारित अध्यापन, अनुभवानिष्टीत ,संवादात्मक शिक्षण , समग्र विकास यावर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. म्हणजेच आजच्या घडीला शिक्षकांना पारंपारिक चौकटीच्या पलीकडे जाऊन खेळ, प्रयोग, प्रत्यक्ष अनुभव, विचार प्रवृत्ती व भावनिक बंध यांचा अध्यापनात समावेश करणे गरजेचे आहे.

पूर्वी शिक्षण प्रामुख्याने पाठांतर व परीक्षा केंद्रित होते .मात्र आज विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानाने पुढे जात नाहीत तर अनुभव, कृती व संवादी शिक्षणातून अधिक प्रगल्भ होतात ,शिकतात. त्यामुळे आपण गोष्टींच्या माध्यमातून शिकवणे, शैक्षणिक खेळ, समूह चर्चा ,कार्यशाळा ,नाट्य सादरीकरण ,प्रयोग ,स्थानिक खेळ व अनुभवावर आधारित प्रकल्प इत्यादी शैक्षणिक कृतींचा समावेश अध्यापनात करणे महत्त्वाचे ठरणार आहे आणि यामुळे नक्कीच आपले विद्यार्थी अधिक सक्रिय, उत्सुक, आत्मविश्वासू बनतील.                 

    त्याचप्रमाणे  अध्ययन प्रक्रिया अधिक यशस्वी होण्यासाठी शिक्षक _विद्यार्थी संवाद ही महत्त्वपूर्ण बाब आहे .संवादामधून शिक्षक विद्यार्थ्यांच्या विचारसरणी, गरजा अडचणी व स्वभाव समजून घेऊ शकतात व त्यातून आपली मूल्यमापन प्रक्रिया ही अधिक सुलभ होण्यास मदत होते. त्यामुळे शिकवताना एकाच पद्धतीवर न राहता विविध पद्धती वापरणे . यामध्ये प्रश्नोत्तरे व चर्चेचे सवय लावणे, विद्यार्थ्यांना स्वतः विचार करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे . नव्या धोरणानुसार नुसार विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लवचिकता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गतीनुसार शिकवण्याची तयारी या गोष्टीला वाव मिळेल.

     एक महत्त्वपूर्ण बाबीचा येथे उल्लेख करावासा वाटतो ती म्हणजे विद्यार्थ्यांचा समग्र विकास .राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासावर अत्याधिक भर दिला आहे .आधी उल्लेख केलेल्या काही पद्धतींचा अध्यापनात अवलंब केला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकासासाठी गटकार्य, समाजसेवा उपक्रम, सहकार्य भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. भावनिक विकासासाठी समुपदेशन ,जीवन कौशल्यांवर आधारित शिक्षण, मूल्यशिक्षण यांचा अंतर्भाव करून शिक्षण देणे महत्त्वाचे ठरेल आणि शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग ,खेळ, शारीरिक शिक्षण ,गणितातील कोडी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयोग ठरेल व हे मार्गदर्शन आपल्याला प्रशिक्षण सत्रातून मिळालेले आहेच.

        थोडक्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे  विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे तर जीवनासाठी सज्ज करते. म्हणूनच शिक्षकांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीत परिवर्तन घडवून कृतिशील ,संवाद प्रधान, व लवचिक शिक्षण देणे गरजेचे आहे .त्यामुळे विद्यार्थी केवळ यशस्वी नव्हे तर सक्षम ,सशक्त व संवेदनशील नागरिक होतील यात शंका नाही. चला तर मग  सर्वजण मिळून या नव्या शिक्षण युगात  विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी सज्ज होऊया....!!!

         सौ .उर्मिला जाधव.....सहाय्यक शिक्षक,          विद्या मंदिर मांडा टिटवाळा,छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण.

Post a Comment

0 Comments