Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मा.श्री.शेरसिंग डागोर यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस भेट

महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांशी निगडीत बाबींचा घेतला आढावा 

             ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.शेरसिंग डागोर यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस भेट देवून महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांशी निगडीत बाबींचा आढावा घेतला. महापालिकेच्या मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक संचालक नगररचना संतोष‍ डोईफोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपा शुक्ल, महापालिका सचिव किशोर शेळके तसेच इतर अधिकारी वर्ग कर्मचारी आणि विविध सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे यांनी वारसा हक्काद्वारे सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नियुक्ती, सफाई कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजना, सफाई कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतची माहिती, श्रमसाफल्य योजना याबाबत PPT द्वारे उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी, त्यांच्या क्षमता बांधणीसाठी मार्गदर्शन शिबीरे, तणाव मुक्तीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विपश्यना ध्यान साधना शिबीर, योग साधना शिबीर तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी कर्करोग निदान शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात येतात, अशीही माहिती दिली.

त्याचप्रमाणे शासनाची "नमस्ते योजना”,मनि:  वाहिन्यांची यांत्रिक पध्दतीने सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असल्याबाबतची माहिती उपआयुक्त वंदना गुळवे यांनी यावेळी दिली. महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्र. कामगार कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी या अधिकाऱ्यामार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळ देवून, त्यांच्या अडचणी सोडविल्या जातात, अशी माहिती दिली असता या उपक्रमाची प्रशंसा करीत तक्रार निवारणासाठी वेळ निश्चित करुन द्यावी, अशा सूचना मा.अध्यक्ष श्री.शेरसिंग डागोर यांनी यावेळी केल्या.

श्रमसाफल्य योजनेसह इतर धोरणाबाबत चर्चा करुन, तसेच बीएसयुपी मधील 15 टक्के घरे सफाई कर्मचाऱ्यांसाठी देणेबाबत, टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत दिली.

लाड पागे समिती अंतर्गतची प्रकरणे 30 जलद गतीने निकाली काढावी, तसेच श्रमसाफल्य आवास योजनेसाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या जागेचे सर्वेक्षण करुन, विविध योजनांच्या माध्यमातून मालकी हक्क देणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांची समिती करुन, कालबध्द कार्यवाही करावी, यासाठी कामगार संघटनांची देखील मदत घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.शेरसिंग डागोर यांनी यावेळी दिल्या आणि महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध धोरणांबाबत समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments