ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी खेळाडू केंद्रबिंदू मानून सुधारणा होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेचे स्वतंत्र क्रीडा धोरण झाले पाहिजे, शालेय क्रीडा स्पर्धा या दर्जेदार पद्धतीने झाल्या पाहिजेत तसेच महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमधील क्रीडा सुप्त गुण हेरून एकविध क्रीडा संघटनेच्या प्रशिक्षकांकडून विनामूल्य मार्गदर्शन करणे अशा विविध विषयांच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे प्रा. उदय नाईक, प्रा. श्रीराम पाटील, प्रा. लक्ष्मण इंगळे, डॉ. यज्ञेश्वर बागराव, प्रताप पगार, संजय काळे, बाळू उबाळे व अंकुर आहेर या प्रतिनिधींनी आयुक्त अभिनव गोयल व क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांची भेट घेतली.
महाराष्ट्र शासनाच्या २००३ च्या शासन निर्णयानुसार शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्याचा दर्जा मिळवणारी पहिली महानगरपालिका म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका ओळखली जाते. ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५३ शासनमान्य व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यताप्राप्त एकविध क्रीडा संघटना जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाच्या माध्यमातून संघटित झाल्या. २०३६ च्या ऑलिम्पिक मध्ये ठाणे जिल्ह्यातील खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील या उदात्त हेतूने महासंघाने कार्य हाती घेतले आहे.
कल्याण डोंबिवली ही क्रीडा क्षेत्रातील पंढरी. कुस्ती, जिमनॅस्टिक, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, कबड्डी, आट्या पाट्या, कॅरम अशा देशी विदेशी खेळांमधील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू याच मातीत घडले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही प्रगत महानगरपालिका असताना आज खेळाडू, क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटनांना क्रीडा सुविधा नसल्याने अनेक समस्या भेडसावत आहेत.
महानगरपालिकेला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यावर शासन निर्णयानुसार क्रीडा समिती स्थापन केली होती. परंतु सध्या क्रीडा समिती अस्तित्वात नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिकेचा क्रीडा विभाग यांच्यात समन्वय नाही. अन्य सर्वच महानगरपालिकेत स्पर्धा संपल्यानंतर त्या खेळातील विजयी संघांना पदके दिली जातात. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विजयी खेळाडूंचे कौतुक केले जात नाही याची खंत महासंघाने मांडली. विजयी खेळाडूंची प्रमाणपत्रे ऑनलाईन काढून स्वाक्षरी साठी क्रीडा विभागाकडे क्रीडा शिक्षकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. या सर्वच कारणांमुळे क्रीडा शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. परंतु कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त म्हणून संजय जाधव यांनी पदभार स्वीकारल्यामुळे क्रीडा शिक्षक व एकविध क्रीडा संघटनांनी समाधान व्यक्त केले. उपायुक्त संजय जाधव हे स्वतः खेळाडू असल्याने त्यांना खेळाडूंच्या समस्या माहित आहेत.
शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने लवकरच सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत, क्रीडा समितीची रचना सुरु असून क्रीडा समितीची बैठकही घेणार असल्याबाबत संजय जाधव यांनी सांगितले. २०२४-२५ पूर्वी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये झालेल्या घटनांवर चर्चा न करता यापुढे क्रीडा विभागाकडे काटेकोरपणे लक्ष देवून शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घेणार असे सकारात्मक आश्वासन संजय जाधव यांनी दिले. खेळाडूंना न्याय मिळावा व क्रीडा विभागाच्या माध्यमातून उत्तम व गुणवत्तापूर्ण काम व्हावे यासाठी क्रीडा पर्यवेक्षिका ची जागा भरणार आहोत असे क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments