चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात, सुदैवाने जिवित हानी टाळली
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेकडील पूना लिंक रोड येथील विजयनगर येथे एक रेतीने भरलेला डंपर ब्रेक निकामी झाल्याने डिव्हायडरवर चढून त्याचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, ही दोन महिन्यातली तिसरी घटना आहे. येथील काटे मानवली नाका ते पुना लिंक रोड, विजयनगर, तिसगाव नाका, चक्की नाका येथे मोठा उतार असल्याने अवजड वाहनांचे असे अपघात होत आहेत.
विजयनगर भागात अगदी काही दिवसांपूर्वी अशाच एका ब्रेक निकामी झालेल्या मोठ्या ट्रकने सात – आठ वाहनांना धडक दिली होती. यात तीन जण गंभीर जखमी झाले होते. अशा घटना यापूर्वीही इथे घडल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा डंपरचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याचा प्रकार घडला. याचे कारण, या रस्त्यावर मोठा उतार असून मोठ्या अवजड वाहनांचे या रस्त्यावर ब्रेक दाबला तरी वाहन पुढे जात राहते. अशावेळी अनेकदा ब्रेक निकामी होण्याचा प्रकार होतो. त्यामुळे काटेमानिवली टेकडीचा हा चढ कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने कापून समतल करावा. जेणेकरून अवजड वाहनांचे अपघात होणार नाहीत. तसेच, या भागात वाहतूक पोलीस, वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल बसवले जावेत अशी मागणी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे.
मात्र, इथले स्थानिक नागरिक अविनाश ओंबासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर एक दिवसाआड अशा अपघाताच्या छोट्या – मोठ्या घटना घडत आहेत. तसेच, या भागात शाळा आहेत. जर शाळा सुटल्यावर विद्यार्थी बाहेर पडताना असे अपघात झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते असे भीती ओंबासे यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, वाहतूक पोलीस आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेकडे इथे ट्राफिक वॉर्डन नेमण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्यांनी आजतागायत इथे ट्राफिक वॉर्डन नेमला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments