"शेतकऱ्यांच्या हक्कावर घाला घातला गेल्यास जनहित याचिका दाखल करणार" – माजी सदस्याचा इशारा
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी शेडच्या जागेवर गाळे बांधण्याच्या ठराव क्रं 11 ला माजी कृषी उत्पन्न समिती सदस्य मयूर पाटील यांनी प्रशासक यांना पत्र देत ठराव रद्द करण्याची मागणी केल्याने संदर्भीत ठराव वादाच्या भोवऱ्यात आला आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत समिती सदस्य आणि संचालक मंडळाची मनमानी सुरु असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. आता प्रशासक नेमण्याच्या चाहूल लागताच तत्कालीन समितीने आयत्या वेळच्या सभेत ठराव मंजूर करत शेतकरी शेडचे आरक्षण बदलून त्या जागी २० व्यावसायिक गाळे बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र यामुळे आधीच आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकर्यांना बाजार समितीत जागेसाठी झगडावे लागत असताना त्यांच्या हक्काच्या जागेवर बाजार समितीकडून कब्जा करत शेतकऱ्यांचा हक्क हिरावला जात असल्याचा आरोप माजी संचालक मंडळाचे सदस्य मयूर पाटील यांनी केला आहे. तसेच हा ठराव फेटाळत शेतकऱ्यांच्या हक्काची जागा शेतकरी शेडसाठीच राखीव ठेवावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी बाजार समितीच्या प्रशासकांना दिला आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्यानंतरही समितीने तीन वेळा मुदत वाढ घेतली. या काळात नियमबाह्य नोकर भरती केल्याचा आरोप केला जात असतानाच आता या समितीने शेतकरी शेडसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून त्या जागेवर बी टाईप २० गाळे असलेल्या इमारतीचे काम करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या गाळ्याच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून बाजार समिती मधील डीपी रस्त्याची कामे केली जाणार असल्याचे सांगत शेवटच्या समितीच्या बैठकीत या ठरावाला मान्यता घेण्यात आली. या गाळ्यांची समिती सदस्यांनी पूर्वीच विक्री केल्याचा पाटील यांचा आरोप आहे.
दरम्यान या इमारतीमुळे शेतकर्याच्या हक्कावर बाधा येणार असल्याने हा ठराव रद्द करत त्या जागेवर शेतकर्यासाठी शेड उभारली जावी. ज्यामुळे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, पालघर सह आजूबाजूच्या परिसरातून शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकर्यांना हक्काची जागा उपलब्ध होईल. या शेतकर्यांना बाजार समितीत जागा नसल्याने हे शेतकरी जागा मिळेल तिथे शेतमाल विक्रीसाठी बसत असल्याने बाजार समितीत वाहतुकीची समस्या निर्माण झाली असल्याने त्यांना त्यांच्या हक्काची जागा दिली जावी यासाठी तत्कालीन समितीने मंजूर केलेला ठराव तत्काळ रद्द करावा अन्यथा शेतकर्याच्या हक्कासाठी आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
" या संदर्भात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक किशोर मांडे यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही."
.jpg)

Post a Comment
0 Comments