ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
नागरिकांच्या त्रासाचा आणि सोयीचा विचार करता कल्याण पश्चिमेत सर्वच सरकारी कार्यालये एकाच इमारतीमध्ये असणारे प्रशासकीय भवन उभारण्याची मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात पवार यांनी नुकतीच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार करता येथील रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती कार्यालय अशी सर्वच प्रमुख शासकीय कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांमध्ये आपापल्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या अतिशय मोठी आहे. त्यातच कल्याण हे रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असल्याने त्याद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्याही लाखांच्या घरात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले.
परिणामी इतक्या मोठ्या नागरिकांच्या येण्या जाण्याचा ताण इथल्या रस्त्यावर, वाहतुकीवर आणि वाहतुकीच्या साधनांवर येत असून कोणत्याही वेळी हा परिसर गर्दी, वाहतूक कोंडी आणि हजारो वाहनांनी गजबजलेला असतो. या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या जवळ असणारी मात्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली ही सर्व कार्यालये एकाच प्रशासकीय भवनाच्या इमारतीमध्ये समाविष्ट केली तर नागरिकांची मोठी सोय तर होईलच, परंतु त्याचसोबत कल्याण स्टेशन परिसर वाहतूक कोंडीमुक्त होऊन इतर लोकांनाही त्याचा त्रास होणार नसल्याचा मुद्दाही नरेंद्र पवार यांनी यावेळी अधोरेखित केला.
या सर्व बाबींचा विचार करता कल्याण पश्चिमेसाठी नव्या प्रशासकीय भवनाला मान्यता देण्यासह त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे यावेळी केली आहे. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments