जागतिक महिला दिनी उपक्रमाला
सुरवात
कराटे, दांड पट्टा, तलवारबाजीसह दंड
आणि सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनाक्रम पाहता सध्याच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्तीसह स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याणातील शालेय विद्यार्थ्यांना आता स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नरेंद्र पवार फाऊंडेशनमार्फत कल्याण पश्चिमेतील शशांक बालविहार शाळेपासून या निःशुल्क उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
गेल्या काही काळामध्ये झालेल्या सामाजिक बदलांचा शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय नकारात्मक परिणाम जाणवत आहे. त्यातच आपली बदललेली जीवनशैली, पौष्टिक आणि सात्विक आहाराऐवजी फास्ट फूडच्या भडिमारात या शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर झालेले विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. आणि हेही कमी म्हणून की काय शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेमका हाच धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा विडा उचलला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक - मानसिक आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यामध्ये स्वसंरक्षणाची जाणीव जागृत करण्यासाठी मोफत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून त्यामध्ये कराटे, दांड पट्टा, तलवारबाजीसोबतच सूर्य नमस्कार, दोरीच्या उड्या आदींचे तज्ज्ञ व्यक्तींमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
आज कल्याणच्या शशांक बालविहार शाळेपासून या उपक्रमाचा प्रारंभ झाला असून कल्याण पश्चिमेतील तब्बल 150 शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर 15 शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी या विद्यार्थ्यांना दांड पट्टा, दंड आणि तलवार या शस्त्रांची माहिती देण्यासह त्यांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
.jpg)

Post a Comment
0 Comments