Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गुढीपाडव्याची भेट; बदलापूर मेट्रोला हिरवा कंदील

 उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्वतः मंजुरी दिली आहे. तातडीने हे काम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या कामाला आता वेग येणार असल्याचे किसन कथोरे यांनी सांगितले. 

                  ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर 

सुमारे दशकभरापासून चर्चेत असलेल्या कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गाला एमएमआरडीए च्या अर्थसंकल्पात तत्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता या मेट्रो मार्गाच्या उभारणीला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्य सरकारने ही बदलापूरकरांना दिलेली गुढीपाडव्याची भेट असल्याची भावना आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

मेट्रो 14 हा कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग 37.8 किमी लांबीचा आहे. या मार्गावर 15 स्थानके असणार असून त्यासाठी सुमारे 14 हजार 898 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बदलापुरातून दररोज हजारो चाकरमानी मुंबईला प्रवास करीत असतात त्यांची बदलापूरपर्यंत मेट्रो यावी, अशी मागणी होती. त्यानुसार आमदार किसन कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा वर्षापूर्वी याबाबत मागणी केली होती.

वेस्टर्न मार्गावर जाणे सोयीचे व्हावे यासाठी बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रो मार्गाची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रो मार्गाला मंजुरी देण्याची तयारी केली होती. परंतु त्याच काळात निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा विषय प्रलंबित राहिला. त्यानंतरच्या दहा वर्षात याबाबत कोणतीही. कार्यवाही झाली नाही. मात्र अलीकडेच बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी आपल्या प्रलंबित असलेल्या मेट्रोच्या मागणीवर कार्यवाही करण्याची विनंती आमदार किसन कथोरे यांनी केली. त्यावर तातडीने या प्रकल्पाला दिशा दिली जाईल. लवकरात लवकर हे काम मार्गी लावले जाईल, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी त्याच आठवड्यात मेट्रो मार्गाच्या भूसंपादनाबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

मेट्रोची गुढीपाडवा भेट

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्वतः मंजुरी दिली आहे. तातडीने हे काम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या कामाला आता वेग येणार असल्याचे किसन कथोरे यांनी सांगितले. राज्य सरकारने बदलापूरकरांना दिलेली ही मेट्रोची गुढीपाडवा भेट असल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे बदलापूरकरांच्या वतीने आभार मानले आहेत.

बदलापूरकरांना मोठा फायदा होणार

मेट्रो 14 मार्गामुळे बदलापूर अंबरनाथ पश्चिम रेल्वेवर असलेल्या स्थानकांना जोडणारी मेट्रो कांजूरमार्ग येथे पोहोचणार आहे. तिथून अंधेरी, तसेच दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई या भागात मेट्रोचा मध्य भाग असणार आहे. त्याचा फायदा बदलापुरातील नागरिकांना पश्चिम उपनगरात जाण्यासाठी ही होणार आहे. तसेच मेट्रोचे कारशेड बदलापूर येथील कात्रप येथे प्रस्तावित आहे. त्यामुळे सहाजिकच मेट्रोची सुरुवात बदलापूर स्थानकातून होणार असल्याने बदलापूरकरांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments