ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी टिटवाळा येथे वारकरी प्रकाशन आणि दैनिक साहित्यवारी यांच्यातर्फे कुमार कृष्णा राहुल मुंढे यांच्या जन्मदिनानिमित्त पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन ज्येष्ठ कवी तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा.चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत शारदासुत सुनील म्हसकर यांस राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुनील म्हसकर हे उत्तम लेखक, कवी, नाटककार, मुद्रितशोधक व परीक्षक, प्रभावी वक्ते, सूत्रसंचालक व निवेदक, तसेच गायक आहेत. ते "शारदासुत" या टोपणनावाने सुपरिचित असून आजतागायत विविध नामांकित अशा वर्तमानपत्र व नियतकालिके यांत त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच सुनील म्हसकर हे स्वामी विवेकानंद संस्था पाली, शहापूर या राष्ट्रीय पातळीवरील कार्य करणाऱ्या नामांकित संस्थेचे आणि अखिल भारतीय साहित्य व कलासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आजतागायत त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबाबत अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झालेले आहेत. त्यांस राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार भोईर, गुलाबराजा फुलमाळी, रवींद्र यशवंतराव, ज्येष्ठ संपादक व पत्रकार विजय यादव, नवनाथ रणखांबे, आयोजक कांचन गवळी, अनिता कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कविसंमेलनात ज्येष्ठ कवी राजेश साबळे, कवयित्री नंदा कोकाटे, शारदासुत सुनील म्हसकर, सुरेखा गायकवाड, अनिता कळसकर, सरोज गाजरे, अश्विनी म्हात्रे, भूषण ठाकरे, उमा रावते, कुमारी यज्ञिका गायकर आदी कवींनी आपल्या सुंदर सुंदर रचना सादर करून रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले.
Post a Comment
0 Comments